शिष्यवृत्ती परीक्षेकडे विद्यार्थ्यांची पाठ; अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 03:22 AM2018-12-02T03:22:31+5:302018-12-02T03:22:33+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाचवीचे सुमारे ९७ हजार तर आठवीचे १ लाख २१ हजार अर्ज कमी आले आहेत. त्यामुळे परिषदेने अर्ज भरण्यासाठी दहा दिवस मुदतवाढ दिली आहे. आता विलंब शुल्कासह १५ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येतील.
शिष्यवृत्तीसाठी कोटा कमी असल्याने ही घट होत असल्याचे परिषदेकडून सांगितले जात आहे.
परिषदेमार्फत १७ फेब्रुवारी रोजी राज्यभर एकाच वेळी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. या मुदतीत अनुक्रमे ३ लाख ९१ हजार ६२९ व २ लाख ४८ हजार ७२० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले. मागील वर्षी अनुक्रमे ४ लाख ८८ हजार ४८६ व ३ लाख ७० हजार २४३ अर्ज प्राप्त झाले होते. आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये जवळपास १ लाख २१ हजार विद्यार्थ्यांची घट आहे.
>महाराष्ट्रासाठी शिष्यवृत्तीचा कोटा केवळ एक हजार आहे. या वर्षी शिष्यवृत्ती न मिळणाºया विद्यार्थ्यांसाठी उत्तेजनार्थ प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. वाढविलेल्या मुदतीत अर्जांची संख्या लक्षणीय वाढेल, अशी आशा आहे.
- तुकाराम सुपे, आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद