कोणीही याव कोणालाही गोळ्या घालाव्या; महाराष्ट्रात तर गुंडाराज, सुप्रिया सुळेंची टिका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 04:56 PM2024-02-11T16:56:39+5:302024-02-11T16:57:00+5:30
देशात लोकशाही राहिलेली नाही, ही दडपशाहीच सुरु असून महाराष्ट्रही सुसंस्कृत राहिलेलाच नाही
बारामती : वकील, डॉक्टर, पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्त्यांवर राज्यात हल्ला होत आहे, लोकसभेत मला लोकांनी या बाबत विधेयक मांडण्यास सांगितले आहे, राज्यात गुंडाराज आहे, कोणीही याव कोणालाही गोळ्या घालाव्या, पिस्तूल म्हणजे तर चेष्टा झाली आहे, ठाणे, नागपूर व पुणे या तिन्ही शहरात ज्या पध्दतीने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे, याला मंत्रीच जबाबदार आहेत. देशात लोकशाही राहिलेली नाही, ही दडपशाहीच सुरु आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र राहिलेलाच नाही, गुंडाराज सुरु झाला आहे. या गुंडगिरीच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढणार आहोत ,अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली .
बारामतीत पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी कायदा सुव्यवस्थेवर ताशेरे ओढले .सुळे म्हणाल्या ,माझ्यावर गोळी जरी चालवली तरी ही सुप्रिया सुळे दडपशाहीसमोर कधीही झुकणार नाही, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी आमच्या गाड्या फोडल्या किंवा हल्ले केले, आमचा जीव घेतला तरी आम्ही घाबरणार नसल्याचा इशारा सुळे यांनी दिला.
निखिल वागळे, असीम सरोदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करते असे सांगून सुप्रिया सुळे म्हणाल्या, देशात लोकशाही राहिलेली नाही, ही दडपशाहीच सुरु आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र राहिलेलाच नाही, गुंडाराज सुरु झाल्याची टिका त्यांनी केली. माझ्याविरोधात कोणीही उभे राहिले तरी हरकत नाही, लोकशाहीत विरोधक असायलाच हवा, फक्त तो दिलदार असावा इतकीच अपेक्षा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पाणी, बेरोजगारी व पिकांना न मिळणारा हमीभाव ही तीन प्रमुख आव्हाने आहेत. देशाच्या ग्रामीण भागातील लोकांची क्रयशक्ती घटताना दिसते असून ती वाढणे अर्थव्यवस्थेसाठी महत्वाचे आहे. टंचाईबाबत राज्य सरकारला अनेक माध्यमातून विनंती केली, बेरोजगारी बाबत केंद्र सरकारला अनेकदा सांगूनही फार फायदा होत नाही. हमीभावही मिळत नाही पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. शेतक-यांच्या विरोधातील हे सरकार आहे, शेतक-यांनी जर पिकविण्याचे बंद केले तर या देशाचे काय होईल, असा सवाल करत सरकारने या बाबत विचार करावा. आंदोलने करुनही सरकार ऐकतच नाही. आमच्यापुढे आता मार्गच शिल्लक राहिलेला नाही.
एकीकडे आंध्र, ओरिसा येथील आरक्षणाचे प्रश्न बिलाद्वारे सरकारने लोकसभेत मांडले, मग राज्यातील धनगर आरक्षणाचा मुद्दा का आणला नाही, महाराष्ट्र सरकारने राज्यातील आरक्षणाचे प्रश्न केंद्राला पाठवलेलेच नसल्याचे उत्तर देण्यात आले, इतर राज्य पाठवतात मग महाराष्ट्र सरकार का प्रश्न पाठवत नाहीत, असा सवालच सुळे यांनी विचारला. मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करतात ही फसवणूक नाही तर काय आहे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला .
केंद्राचा महाराष्ट्रावर कसला राग आहे, गुंतवणूक दुस-या राज्यांत जाते, इतर राज्याचे आरक्षणाचे प्रश्न सुटतात महाराष्ट्राचे नाही, एकदा नाही लाख वेळा लोकसभेत मी प्रश्न मांडेन मला त्यात कसलाच कमी पणा वाटत नाही पण प्रश्न सोडविल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे त्या म्हणाल्या .
वकील, डॉक्टर, पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्त्यांवर राज्यात हल्ला होत आहे, लोकसभेत मला लोकांनी या बाबत विधेयक मांडण्यास सांगितले आहे, राज्यात गुंडाराज आहे, कोणीही याव कोणालाही गोळ्या घालाव्या, पिस्तूल म्हणजे तर चेष्टा झाली आहे, ठाणे, नागपूर व पुणे या तिन्ही शहरात ज्या पध्दतीने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे, याला मंत्रीच जबाबदार आहेत, मंत्र्यांचे राजीनामे देखील मागायचे नाहीत का, असा देखील सवाल त्यांनी केला. सुनेत्रा पवारांच्या फ्लेक्सवर शाईफेक ही चुकीचीच असून ज्याने कोणी हे कृत्य केले त्याची चौकशी व्हायलाच हवी, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.