मराठ्यांचा इतिहास जगात जावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:05 AM2021-01-24T04:05:24+5:302021-01-24T04:05:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आपला इतिहास हा भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रमाणावर उपयोग ...

Let the history of Marathas go to the world | मराठ्यांचा इतिहास जगात जावा

मराठ्यांचा इतिहास जगात जावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “आपला इतिहास हा भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रमाणावर उपयोग कारण्याप्रमाणे सोशल नेटवर्किंगचा प्राधान्याने विचार करण्याची गरज आहे,” असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर प्रकाशित आणि डॉ. केदार फाळके लिखित ‘छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती’ या ग्रंथाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सदानंद मोरे, संस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन, लेखक डॉ. केदार फाळके या वेळी उपस्थित होते. संस्थेच्या वतीने ‘बुधभूषण’ ग्रंथाचेही प्रकाशन या वेळी करण्यात आले.

नाईक निंबाळकर म्हणाले की, यापुढील काळात संशोधनाची प्रक्रिया सुरु राहिली पाहिजे. गेल्या काही वर्षांत सोशल नेटवर्क मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहे. त्याच्या आधारावर आपण इतिहास जगामध्ये नेला पाहिजे. त्यासाठी जे जे सहकार्य लागणार आहे ते देण्याची माझी तयारी आहे. डॉ. मोरे यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून इतिहासाच्या पुनर्मांडणीचा करण्यात येणारा उपक्रम हा नक्कीच स्वागतार्ह आहे. शालेय स्तरावरील पुस्तकांमध्ये इतिहासाचा समावेश झाला. आता बौद्धिक पातळीवर होणे गरजेचे आहे.

बलकवडे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती सांगणाऱ्या या ग्रंथाचे वेगळे महत्त्व आहे. उद्याच्या पिढीसाठी अशा स्वरूपाच्या संशोधनात्मक ग्रंथाचे लेखन गरजेचे आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक धोरणे आखली आणि ती प्रत्यक्षात आणली त्याचे विवेचन ग्रंथात आहे. डॉ. फाळके यांनी पुस्तक लेखनामागची भूमिका मांडली. पटवर्धन यांनी येत्या सहा महिन्यांत पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केली जाणार असल्याचे जाहीर केले. श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले. विश्वस्त प्रदीप रावत यांनी आभार मानले.

Web Title: Let the history of Marathas go to the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.