रात्रभर भरू द्या पेले, महाविद्यालयेही फुलू द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:11 AM2021-02-12T04:11:06+5:302021-02-12T04:11:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिका हद्दीतील शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार, बॅंक्वेट हॉल व फूड कोर्ट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिका हद्दीतील शहरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार, बॅंक्वेट हॉल व फूड कोर्ट यांना पुणे महापालिकेने मध्यरात्री एकपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याचबरोबर शहरातील मद्यविक्री दुकानांची वेळ रात्री साडेदहापर्यंत वाढवली आहे.
दुसरीकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आदेशानुसार, महापालिकेने शहरातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारी पासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना, प्रत्येक महाविद्यालयाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे बंधन घातले आहे.
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या दोन परवानग्या देतानाच आयुक्तांनी, आतापर्यंत केवळ खेळाडूंनाच खुले असणारे जलतरण तलाव आता सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली केली आहेत.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शहरातील ‘स्पा सेंटर’नाही परवानगी देण्यात आली आहे. स्पा सेंटर, हॉटेल, रेस्टॉरंट व बार सुरू ठेवतानाच संबंधित आस्थापनांनी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने दिलेल्या आदेशाचे व सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
--------