VIDEO: "मला बोलू द्या, नाहीतर मी आत्महत्या करेल" जरांगे पाटलांच्या सभेत तरुणांचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 03:18 PM2023-10-20T15:18:36+5:302023-10-20T18:17:55+5:30
राजगुरूनगर येथे आले असता सभा संपल्यानंतर एका तरुणाने स्टेजवर येत माईक हातात घेऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला....
शेलपिंपळगाव (पुणे) : राजगुरूनगर येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सभा झाली. जरांगे पाटील शुक्रवारी (दि. २०) राजगुरूनगर येथे आले असता सभा संपल्यानंतर एका तरुणाने स्टेजवर येत माईक हातात घेऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
जालना येथील सुनील कावळे या तरुणाने मुंबई येथे गुरुवारी (दि. १९) आत्महत्या केली. या तरुणाला तसेच मराठा आंदोलनादरम्यान ४७ पेक्षा जास्त मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या. त्यांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही. मराठा समाजाला शांततेत आंदोलन करून आरक्षण मिळवून देण्याचा शब्द देत मनोज जरांगे पाटील यांनी या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन केले. त्यानुसार सभा संपल्यानंतर सर्वजण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उभे राहिले असताना एक तरुण अचानक स्टेजवर आला. जरांगे पाटील यांच्या हातातील माईक आपल्या हातात घेऊन त्याने आपल्याला बोलायचे आहे असा आग्रह केला. मात्र सभा संपल्याने आयोजकांनी त्याला बोलू दिले नाही. त्यावरून त्याने गोंधळ करण्याचा प्रयत्न केला
पोलिसांनी संबंधित तरुणाची समजूत काढून त्याला स्टेजवरून खाली नेले. जरांगे पाटील म्हणाले, ” त्या तरुणाची समजूत काढली आहे. त्यांना बोलायचे होते, पण नियोजित कार्यक्रमात बोलता आले नाही. त्यांचे मनपरिवर्तन झाले आहे. मराठा आंदोलनाला गालबोट लागावे हेच सरकारला हवे आहे. पण कोणीही गोंधळ करू नये.”
"मला बोलू द्या, नाहीतर मी आत्महत्या करेल" जरांगे पाटलांच्या सभेत तरुणांचा गोंधळ#punepic.twitter.com/5dtslNUhG4
— Lokmat (@lokmat) October 20, 2023