शाळांवर फौजदारी दाखल करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 05:23 AM2017-07-20T05:23:32+5:302017-07-20T05:23:32+5:30
शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार शाळांना शालेय शिक्षण समितीची बैठक घेणे बंधनकारक आहे; मात्र अनेक शाळा बैठक घेत नसल्याने विद्यार्थ्यांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार शाळांना शालेय शिक्षण समितीची बैठक घेणे बंधनकारक आहे; मात्र अनेक शाळा बैठक घेत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबद्दल अनास्था असल्याचे दिसून येत आहे. दुर्दैवाने शालेय वाहनास एखादा अपघात झाला आणि शाळेने समितीची बैठक घेतली नसेल, तर संबंधित शाळेवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
शालेय विद्यार्थी वाहतूक करणारे चालक व सहायक यांची कार्यशाळा प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती देताना आजरी यांनी हा इशारा दिला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत या वेळी उपस्थित होते.
आजरी म्हणाले की, शालेय वाहतूक नियमावलीची अंमलबजावणी ही निरंतर प्रक्रिया आहे. यात शिक्षण विभाग, वाहतूक पोलीस आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. या सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. नियमावलीची अंमलबजावणी केल्याने विद्यार्थी वाहतुकीची सुरक्षितता वाढते; मात्र यासंदर्भात पालकांमध्येदेखील उदासीनता दिसून येते, तर दुसरीकडे शालेय शिक्षण समितीच्या बैठका शाळांमध्ये नियमित झाल्यास सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटेल. बैठका न घेणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचे अधिकार शिक्षण विभागाला आहेत.
कार्यशाळेबद्दल माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, या कार्यशाळेमध्ये रोटरी
क्लबतर्फे मोफत आरोग्य तपासणी होणार आहे;
तसेच सहभागी व्यक्तींचा मोफत एक लाखाचा विमाही काढून दिला जाणार आहे.
ज्या शालेय वाहतूकदारांनी अद्यापही वाहनांची तपासणी करून घेतली नाही, त्यांना शेवटची संधी म्हणून शिबिरामध्ये फेरतपासणी करून दिली जाईल.
हे शिबिर शनिवारी दुपारी तीन वाजता औंध येथील भारतरत्न पं. भीमसेन जोशी सभागृहात होणार आहे. दरम्यान, शहरात ३ हजार ७०० शालेय वाहतूक करणारी वाहने असून, त्यापैकी १२०० तपासणी न केलेल्या वाहनांना नोटिसा धाडण्यात आल्या आहेत.