नक्षलवाद्यांच्या भूमिकेवरही नाटक येऊ द्या; नाट्यलेखक राजीव नाईक परखड मत
By श्रीकिशन काळे | Published: November 17, 2023 02:26 PM2023-11-17T14:26:48+5:302023-11-17T14:26:58+5:30
लोकशाहीवादी रंगभूमीवर प्रत्येकाला सर्वप्रकारचे नाटक करण्याचे स्वातंत्र्य हवं
पुणे : एखादा नक्षलवादी असेल तर त्याला त्याची बाजू मांडू दिली पाहिजे. नक्षलवाद्यावर नाटक येत असेल तर ते होऊ दिले पाहिजे. ते न पाहताच केवळ नावावरून तुम्ही त्यावर टीका करू नका. ते पहा आणि मग ठरवा ते नाकारायचे की स्वीकारायचे. मला अमान्य असलेल्या गोष्टी देखील लोकशाहीवादी रंगभूमीवर यायला हव्यात, असे परखड मत ज्येष्ठ नाट्यलेखक राजीव नाईक यांनी व्यक्त केले.
रूपवेध प्रतिष्ठान, पुणे आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात रंगकर्मी लकी गुप्ता यांना ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार’ नाईक यांच्या हस्ते प्रदान केला. यावेळी दीपा श्रीराम लागू, आनंद लागू, डॉ. मोहन आगाशे, एस. पी. कुलकर्णी, राजेश देशमुख आदी उपस्थित होते. पुरस्कार प्रदान केल्यानंतर लकी गुप्ता यांनी ‘माँ मुझे टागोर बना दो’ याचे सादरीकरण केले.
लोकशाहीवादी रंगभूमीवर प्रत्येकाला सर्वप्रकारचे नाटक करण्याचे स्वातंत्र्य हवं. तात्विक, विचारांमध्ये मतभेद असले तरी देखील, समोरच्यावर केवळ टीका न करता त्याचे म्हणणं जाणून घ्यायला हवं. ते जाणून मग तुम्ही बोलू शकता की, ते योग्य आहे की अयोग्य. पण नाटक न बघता केवळ नावावरून त्यावर टीका करणे कधीच मान्य होणार नाही, असे नाईक म्हणाले.
जर शब्दांची रंगभूमी नको असेल आणि कमानी रंगमंचावरील नाटकाला मुक्त करायचे आहे, तर त्याला ते मुक्त करता यायला हवे. त्याला जर त्या बॉक्समधून बाहेर पडायचे असेल तर ते पडू द्यावे. हेच खऱ्या लोकशाहीवादी रंगभूमीचे लक्षण असते, असे नाईक यांनी सांगितले.
लोकशाहीचे महत्त्व हे आहे की, त्यामध्ये सावरकरवादी, गांधीवादी, मार्क्सवादी हे एकमेकांचे ऐकतात. ऐकू शकतात. तुमची भूमिका ही तुम्ही मांडली पाहिजे. एका भूमिकेवर ठाम राहा. तुम्ही जर सर्वांचे ऐकाल तर भोंगळ व्हाल ना ! भूमिका तर घेतलीच पाहिजे. तुम्ही एखादी गोष्ट अमान्य करत असाल तर त्यावर टीका करू शकता. पण ती गोष्ट पहा आणि मग करा. - राजीव नाईक, ज्येष्ठ नाट्यलेखक