जातिभेदाच्या शृंखला गळून समतेचे राज्य यावे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:12 AM2021-09-18T04:12:30+5:302021-09-18T04:12:30+5:30
पुणे : स्वराज्य म्हणजे सुराज्य. या देशात कुणी गरीब, पीडित राहाणार नाही. हे सगळं संपायला हवं, तरच सुराज्य आलं ...
पुणे : स्वराज्य म्हणजे सुराज्य. या देशात कुणी गरीब, पीडित राहाणार नाही. हे सगळं संपायला हवं, तरच सुराज्य आलं असे म्हणता येईल. पैशानेच सगळी कामे पार पडली जातात ही धारणा संपली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले, तसेच देशातून जातपात संपुष्टात आली पाहिजे. कोविड काळात विविध संस्था-संघटना आणि वैयक्तिक पातळीवर देखील अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. सर्वसामान्य व्यक्तीपासून ते उच्च पदस्थ व्यक्तीपर्यंत सर्वांचाच यात समावेश होता. या कठीण काळात दाखविलेल्या एकजुटीमुळेच आपण हे संकट परतावून लावू शकलो आहोत. अशाच एकजुटीच्या बळावर जातिभेदाच्या शृंखला गळून समतेचे राज्य प्रस्थापित व्हावे, असेही ते म्हणाले.
कोविड काळात जनतेला मदतीचा हात देणारे सेवाव्रती पुण्यातही अग्रेसर होते. पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ युवा फौंडेशनतर्फे पुण्यातील अशाच काही सेवाव्रती व्यक्तींचा आणि संस्थांचा सत्कार भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड ( पीपीसीआर) संस्थेचे अध्यक्ष सुधीर मेहता, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, इस्कॉनच्या अन्नामृत फौंडेशनचे संजय भोसले, तसेच महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने महापौर मुरलीधर मोहोळ, डॉ. संजीव वावरे आणि सिसलकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि आमदार माधुरी मिसाळ उपस्थित होते.
कोश्यारी म्हणाले, जे निष्पाप आणि निष्कलंक आहेत ते समर्पण भावनेने सेवा देत असतात. हा सेवाभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये रूजविला. मोदी यांनी सदैव दुसऱ्यांचे दु:ख, वेदना जाणून घेत धोरणांची आखणी केली. त्यांनी तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या स्वच्छता, शौचालय, वीज, अशा मूलभूत समस्यांना हात घातला. ज्या नागरिकांनी पिढयान्पिढया बँकेची पायरी चढली नव्हती अशांचे जनधन योजने मार्फत बँकेशी संबंंध जोडून दिले.
गिरीश बापट यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. चार्टर्ड अकाऊंटंट राज देशमुख यांनी पुरस्कार्थींचा परिचय करून दिला. सुकुमार देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वाती देव यांनी ‘समाज मन भारावून टाकू’ हे प्रेरणा गीत सादर केले.
-----------------------------------