आम्हाला हक्काचे पाणी प्यायला द्या...!
By admin | Published: May 7, 2017 01:45 AM2017-05-07T01:45:56+5:302017-05-07T01:45:56+5:30
खाटिक गल्लीत पिण्यासाठी पाणी नाही, लाईट केव्हा येतात आणि केव्हा जातात, याचा ताळमेळ नसल्याने या भागातील रहिवाशांना
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : खाटिक गल्लीत पिण्यासाठी पाणी नाही, लाईट केव्हा येतात आणि केव्हा जातात, याचा ताळमेळ नसल्याने या भागातील रहिवाशांना विजेअभावी पाणी मिळणे मुश्किल झाले आहे. तेव्हा खाटिक गल्लीत महिलांना पाणी मिळालेच पाहिजे, अशी भावना नगमा मण्यार यांनी विद्युत महवितरण कंपनीच्या कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत केला. मात्र, उपस्थित अधिकाऱ्यांनी विजेबाबत नियोजन सुरू आहे, असे सांगितल्यानंतर नागरिक शांत झाले.
या वेळी महावितरण केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप भोळे म्हणाले, दौंडचा फिडर भारनियमनमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील, परिणामी जनतेला भारनियमनाला सामोरे जावे लागणार नाही. सध्या सुरू असलेले भारनियमन हे वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे. त्यामुळे आम्हाला काही करता येत नाही. भारनियमनमुक्त करण्यासाठी वीज ग्राहकांनीदेखील वेळीच वीजबिले भरून सहकार्य करावे. या वेळी शहर अभियंता एस. व्ही. डोंबाळे म्हणाले, की नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे भारनियमनाच्यासंदर्भात योग्य ते निर्णय घेतले जात आहेत. सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र खटी म्हणाले, की कुठल्याही परिस्थितीत भारनियमन झाले नाही पाहिजे. आज आम्ही संयम बाळगला आहे, मात्र पुढच्या आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाहीत. नगरसेवक इंद्रजित जगदाळे म्हणाले, की भारनियमनाला वेळ नाही. भारनियमनाची वेळ ठरवून द्यावी. या वेळी उपकार्यकारी अभियंता दिलीप ठोंबरे, संदीप रणदिवे, जीवन ठोंबरे, सोहेल खान, बाबा शेख, नागसेन धेंडे, हरेश ओझा, अनिल सोनवणे, संतोष जताप, रामेश्वर मंत्री, अशोक जगदाळे, सचिन कुलथे उपस्थित होते.
कारवाई केली जाईल
विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत बहुतांशी नागरकिांचा अधिकाऱ्यांच्या वागणुकीबद्दल नकारात्मक सूर होता. महावितरणचे अधिकारी मोबाईल कट करतात, कार्यालयातील दूरध्वनी उचलत नाहीत. यापुढे जर कोणी वीज ग्राहकांचा मोबाईल कट केला तर कडक कारवाई केली जाईल, अशा सूचना महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
या बैठकीत दौंड तालुका अपंग संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर मंत्री म्हणाले, की जर वीजबिल थकले म्हणून भारनियमन करीत असेल ही बाब चुकीची आहे. बड्या व्यक्तींची तसेच शासकीय कार्यालयातील थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गरिबांचे वीज कनेक्शन थकबाकीमध्ये कट केले जाते, असा दुजाभाव करू नका. बड्या लोकांच्या थकीत वीजबिलांची यादी आम्हाला द्या. ती यादी अपंग संस्थेच्या वतीने प्रसिद्ध करतो, की जेणेकरून याचा फायदा महावितरणला होईल.