कोश्यारी व चंद्रकांत पाटील यांना त्यांची जागा दाखवून देऊ; RPI च्या कार्यकर्त्यांकडून खेड शिवापूर टोलनाका बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 04:14 PM2022-12-11T16:14:01+5:302022-12-11T16:14:12+5:30
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा
खेड शिवापूर : पुणे जिल्हा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून रविवार दि. ११ रोजी खेड शिवापूर टोलनाक्यावर टोल बंद आंदोलन करण्यात आले. रविवारी आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी खेड शिवापूर टोलनाका बंद करून आंदोलनास सुरुवात केली. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आरपीआयचे, प्रवीण ओव्हाळ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र कोंडे यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला.
हा पुरोगामी महाराष्ट्र ज्यांनी घडवला, अशा महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या कोशारी व चंद्रकांत पाटील यांना त्यांची जागा दाखवून देऊ. भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या मतपेट्या भरण्यासाठी समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे. त्याला कदापिही यश येणार नाही. महापुरुषांना खालच्या पातळीवर टिका टिपण्णी करणे हे महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले असतील किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचाराची ज्योत कायम आपल्या मनात तेवत ठेवणे हे आपले परमकर्तव्य आहे. त्यामुळे अशा महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांना विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांचे सरकार पाडण्यासाठीची ताकद निर्माण केली पाहिजे. असे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना यावेळेस करण्यात आले. यावेळी राजगड पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.