आम्हाला मोकळेपणाने बोलू द्या.. विद्यार्थ्यांची राज्यपालांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 09:47 PM2020-01-08T21:47:15+5:302020-01-08T21:53:12+5:30
विद्यापीठे म्हणजे तुरूंग नसून शिक्षणाचे मुक्त मंदिर आहे.
पुणे : विद्यापीठे म्हणजे तुरूंग नसून शिक्षणाचे मुक्त मंदिर आहे. तिथे विद्यार्थ्यांना मोकळेपणाने बोलू वावरू देणे आवश्यक आहे, त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील सुरक्षेविषयीच्या जाचक अटी व नियम रद्द करण्यात यावेत या मागणीसह नागरिकत्व नोंदणी व दुरूस्ती कायद्याच्या निषेध करणारे निवेदनही विद्यार्थ्यांच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आले.
विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी राज्यपाल बुधवारी विद्यापीठात आले होते. फुले शाहू आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्या पदाधिकाºयांनी त्यांची भेट घेतली व त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. सुरक्षेच्या विषयाचा बाऊ करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बंधने आणली जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी राज्यपालांकडे केली.
सतीश गोरे, कमलाकर शेटे, सतीशकुमार पडोळकर, रुकसाना शेख, मोनाली अवसरमल, सागर अलकुंटे, अहमद शेख हे अन्य विद्यार्थी संघटनांचे प्रमुखही यावेळी उपस्थित होते. त्यांनीही या निवेदनावर स्वाक्षºया केल्या. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा व नागरिकत्व सुधारणा कायदा याला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. त्यांच्याबरोबर चर्चा करण्याऐेवजी केंद्र सरकार पोलिसी बळ वापरून त्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची टिकाही निवेदनात करण्यात आली आहे.
दुसºया निवेदनात राज्यातील विद्यापीठांमधल्या काही गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. पुणे विद्यापीठातील कुलसचिवांच्या अनधिकृत वेतनवाढी प्रकरणाची चौकशी करावी, विद्यार्थ्यांच्या गुणवाढी प्रकरणात सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना निलंबित करावे, देशातल्या सर्व विद्यापीठांमधील फी वाढ मागे घ्यावी, संशोधन करण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी, शिक्षण स्वस्त व्हावे यासाठी कृती आराखडा तयार करावा, बेरोजगारीवर उपाययोजना करावी या मागण्याचा त्यात समावेश आहे.