एकमेकांच्या मैत्रिणी बनत घेऊ गगनभरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:11 AM2020-12-24T04:11:45+5:302020-12-24T04:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : समाजाच्या विविध क्षेत्रात बुद्धी, सौंदर्य, कर्तुत्त्वाच्या जोरावर स्वत:ची मोहोर उमटवणाऱ्या पुण्यातल्या यशस्वी महिला ‘लोकमत’च्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : समाजाच्या विविध क्षेत्रात बुद्धी, सौंदर्य, कर्तुत्त्वाच्या जोरावर स्वत:ची मोहोर उमटवणाऱ्या पुण्यातल्या यशस्वी महिला ‘लोकमत’च्या व्यासपीठावर एकत्र आल्या होत्या. स्त्रियांनी चांगल्या मैत्रिणी बनत एकमेकांना सहकार्य करत राहावे आणि समाजात यशोगाथा निर्माण कराव्यात. नव्या युगातली स्त्री उन्मुक्त आकाशात गरुडझेप घेऊ इच्छिते. तिचा हा प्रवास न अडखळता व्हावा यासाठी चला एकत्र येऊ....आणि उंच झोका घेऊ, असाच निर्धार यावेळी सर्वांनी केला.
आपल्या कर्तुत्त्वाने विविध क्षेत्रे पादाक्रांत करणाऱ्या रणरागिणींचा जीवनप्रवास शब्दबद्ध केलेल्या ‘लोकमत वुमेन अचिव्हर्स’ या कॉफीटेबल बूकचे प्रकाशन बुधवारी (दि. २३) रोजी विमानतळ रस्त्यावरील हॉटेल रिट्झ कार्लटन येथे झाला. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. खासदार अँड. वंदना चव्हाण, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, भारती हॉस्पिटल मेडिकल फाऊंडेशनच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिता जगताप-कदम आणि सुप्रिया पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेडचे सुशील जाधव, ‘नारायणी सिल्क’चे विशाल हिरेमठ, रोझरी ग्रुपचे विनय अरहाना, ‘लोकमत’चे महाव्यवस्थापक निनाद देसाई यावेळी उपस्थित होते.
‘लोकमत वूमन अॅचिव्हर्स या कॉफी टेबल बुक’मध्ये कर्तुत्त्ववान महिलांचा जीवनपट उलगडला आहे. सामान्य ते असामान्य अशा प्रवासातील कार्यरत महिलांची दखल घेणारा, त्यांना सन्मान आणि अभिमान याची जाणीव देणारा हा सोहळा ठरला. खाचखळग्यांनी भरलेल्या वाटेवरुन आत्मविश्वासाने वाटचाल करत या सर्वांनी स्वत:चा मार्ग तयार केला. आज या कर्तृत्ववान महिलांची गगनभरारी अमर्यादित असून, इतरांना अचंबित करणारी आणि प्रेरणा देणारीही आहे. त्यांचा हा यशस्वी प्रवास, यशोगाथा निश्चितच अनेक धडपडणाऱ्या तरुणींना नकळत प्रेरणा देऊन जाईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.