चला साजरा करूया, ‘पर्यावरण निर्मल गणेशोत्सव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 AM2021-09-09T04:13:48+5:302021-09-09T04:13:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गणेशोत्सव हा घरात सुख-समृध्दी आणतो. म्हणून आपण यंदापासून पर्यावरण निर्मल गणेशोत्सव साजरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सव हा घरात सुख-समृध्दी आणतो. म्हणून आपण यंदापासून पर्यावरण निर्मल गणेशोत्सव साजरा करणार आहोत. आपल्या पुढच्या पिढीसाठी नदी ही प्रदूषणमुक्त ठेवणार आहोत. त्यासाठी घरच्या घरी विसर्जन करून निर्माल्य योग्य ठिकाणी द्यावे आणि प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन पर्यावरण समन्वय कार्यकर्त्यांनी केले आहे.
पर्यावरण व नदी वाचविण्यासाठी पुण्यातील श्रध्दास्थाने एकत्र आली आहेत. त्यांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. या उपक्रमात सुमारे ३४ मंडळे आणि देवस्थानांनी सहभाग नोंदवला आहे. पुण्यात दररोज साधारणपणे ७५० दशलक्ष लिटर मैलापाणी उत्पन्न होते. त्यातील फक्त ३० ते ४० टक्के मैलापाण्यावर प्रक्रिया होते. म्हणजेच रोज जवळपासन ४५० ते ५२५ दशलक्ष लिटर मैलापाणी नदीत सोडले जाते. या नदीत मूर्तीचं आपण विसर्जन करणार का? असा सवाल पर्यावरण कार्यकर्ते गणेश कलापुरे यांनी उपस्थित केला आहे.
कलापुरे म्हणाले,‘गणेश मंडळे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यामुळे यंदापासून त्यांनी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा निर्धार केला आहे. नागरिकांनीही मंडळे किंवा सोसायटी येथे प्लास्टिक व इतर कचरा वेगळा करून द्यावा. पर्यावरण स्नेही वस्तूंचा दैनंदिन जीवनात अधिक वापर करावा. तरच पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे.’
———————————-
या मंडळे, देवस्थानांचा सहभाग
कसबा गणपती, केसरी वाडा गणपती, श्रीमंत दगडूशेठ गणपती, गुरुजी तालीम, तांबडी जोगेश्वरी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, हुतात्मा बाबू गणपती, सरदार विंचूरकर वाडा, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, आळंदी, चतु:श्रृंगी देवस्थान आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.
——————————————————
पर्यावरणासाठी काय करावे?
- घरात तुळसी वृंदावन असावे
- प्लास्टिकचा वापर न करता कापडी पिशवी वापरावी
- ओला व सुका कचरा वेगवेगळा करावा
- घरात ऊर्जा-पाणी यांचा वापर काटकसरीने करावा
- सेंद्रिय व स्वदेशी वस्तूंचा वापर करावा
- घराच्या परिसरात देशी वृक्षलागवड करावी
* सण-समारंभामध्ये प्लास्टिकचा वापर टाळावा
————————————————-