चला पक्ष्यांसाठी कवडी पाट येथे करूया स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:10 AM2021-09-25T04:10:30+5:302021-09-25T04:10:30+5:30
पुणे : पक्षी निरीक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध असणारे कवडी पाट या ठिकाणी पुलावर प्रचंड घाण साठलेली आहे. त्याची स्वच्छता ...
पुणे : पक्षी निरीक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध असणारे कवडी पाट या ठिकाणी पुलावर प्रचंड घाण साठलेली आहे. त्याची स्वच्छता करण्यासाठी ‘स्वच्छ पुणे, स्वच्छ भारत’ या ग्रुपतर्फे येत्या रविवारी (दि.२६) सफाई मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात शहरातील मुठा नदीतून जाणारा कचरा कवडी पाट या ठिकाणी जाऊन अडकतो. तेथील पुलाला हा कचरा साठला असून, कचराकुंडीचे स्वरूप या ठिकाणी आले आहे. त्यामुळे येथील पक्ष्यांना त्यांचे खाद्य शोधण्यासाठी अवघड जात आहे. म्हणून गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी विंग कमांडर पुनीत शर्मा या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवितात. येत्या रविवारीदेखील ही मोहीम होत असून, त्यासाठी कदमवाक ग्रामपंचायत व इतर काही स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला आहे. कवडी पाट येथे सुमारे दोनशेहून अधिक पक्ष्यांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतात. येत्या हिवाळ्यात या ठिकाणी अनेक स्थलांतरी पक्षी येतात. त्यामुळे त्यापूर्वी तेथील कचरा काढण्यात येणार आहे.