माहितीला ज्ञानाची जोड देत चांगले काम घडवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:27+5:302021-01-10T04:08:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आमच्याकडे माहिती आहे तर तुमच्याकडे ज्ञान. या दोन्हीचे एकत्रीकरणातून चांगले काम घडवू. साखर उद्योगाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “आमच्याकडे माहिती आहे तर तुमच्याकडे ज्ञान. या दोन्हीचे एकत्रीकरणातून चांगले काम घडवू. साखर उद्योगाला सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल. अशा संस्थांच्या माध्यमातूनच नवे काही घडत असते,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
वसंतदादा साखर संस्थेच्या (व्हीएसआय) वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री ठाकरे मुंबईतून ऑनलाईन सहभागी झाले. मांजरी येथील संस्थेच्या सभागृहात ही सभा झाली. ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार सभेच्या अध्यक्षस्थानी होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते, साखर आयुक्त शेखर गायकवाड, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आदी यावेळी उपस्थित होते. राज्यातील साखर कारखान्यांचे संचालक ऑनलाईन सहभागी झाले होते.
ठाकरे म्हणाले की, साखर उद्योगाला आवश्यक ती मदत संस्थेच्या माध्यमातून मिळेल व सरकार संस्थेला मदत करेल. एकमेकांच्या सहकार्यातूनच चांगल्या कामाला सुरूवात होत असते. त्यामुळेच सर्व प्रकारच्या मदतीसाठी सरकार तयार आहे. संस्थेच्या विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन करून त्याला मंजुरी घेण्यात आली. ज्येष्ठ मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सूत्रसंचालन केले.