वाचून झालेले ज्ञान करुया दान ; एकलव्य संस्थेचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 04:49 PM2019-11-03T16:49:17+5:302019-11-03T16:50:34+5:30
गाव तिथे ग्रंथालय या उपक्रमासाठी पुस्तके संकलन करण्याच्या उपक्रमाचे आयाेजन फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यता आले हाेते.
पुणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवून देण्यासाठी व सांस्कृतिक विकासासाठी कार्यरत असणाऱ्या एकलव्य सामाजिक विज्ञान बहुउद्देशीय संस्थेकडून पुस्तक संकलन माेहीम राबविण्यात आली. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जुनी पुस्तके, रद्दी, फर्निचर, कम्युटर तसेच कपाटांचे संकलन करण्यात आले. गाव तिथे ग्रंथालय ही चळवळ या उपक्रमाच्या माध्यमातून चालविण्यात येते.
या उपक्रमाला प्रतिसाद देत पुणेकरांनी ३,००० पुस्तके तसेच फर्निचर जमा केले. गाव तिथे ग्रंथालय चळवळीसाठी चालवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणाऱ्या ह्या चळवळीमार्फत उच्च शिक्षणासाठी कार्यशाळा व युवा प्रेरणा केंद्रांत संसाधने उपलब्ध केली जातात. विविध शहरांतून आजवर घेण्यात आलेल्या पुस्तक संकलन मोहिमांमधून ३० हजाराहून जास्त पुस्तके विदर्भ, मराठवाडा, कोकण विभागातील ३० हुन अधिक ग्रंथालयांत पोचवली गेली आहेत. मागील दोन वर्षांपासून पुणेकरांनी ह्या उपक्रमास भरभरून मदत केली आहे. राज्य सरकारच्या ट्रान्सफॉरमिंग महाराष्ट्र स्पर्धेत टीम एकलव्यला ह्या कल्पनेसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पीपल्स चॉईस पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
नुकत्याच यवतमाळमधील घाटंजी येथे एकलव्य अकॅडमीची तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा पार पडली. वंचित घटकांतील ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी ह्यात सहभाग घेतला. एकलव्यमार्फत दुर्गम भागातील ४० हून अधिक विद्यार्थ्यांना ह्यामार्फत टाटा समाजविज्ञान संस्था, अजीम प्रेमजी विद्यापीठ यांसारख्या संस्थांत प्रवेश मिळवून देण्यात यश आले आहे. 'संकलानातून मिळणाऱ्या मदतीतून हे उपक्रम विस्तारण्याचा व जनतेकडून लोकचळवळीसाठी पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रभर नेण्याचा संस्थेचा मानस आहे असे संस्थेचे अध्यक्ष राजू केंद्रे यांनी याप्रसंगी सांगितले.