प्रेरणा देऊया आणि प्रेरणा घेऊया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:35+5:302021-01-03T04:13:35+5:30
पुणे : प्रेरणा देऊया आणि प्रेरणा घेऊया या ब्रीदवाक्याने शिरूर जवळील लांडेवस्ती येथील शाळेत मुख्याध्यापक रेशमा शेख यांनी दिशादर्शक ...
पुणे : प्रेरणा देऊया आणि प्रेरणा घेऊया या ब्रीदवाक्याने शिरूर जवळील लांडेवस्ती येथील शाळेत मुख्याध्यापक रेशमा शेख यांनी दिशादर्शक तंत्रस्नेही शिक्षक-अधिकारी यांची चळवळ सुरु करून वैशिष्टपूर्ण काम हाती घेतले आहे. तसेच कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांना आयसीटी क्षेत्रात सक्षम केले जात असून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे दिलेल्या दिनदर्शिकेवर स्मार्ट कृतिपत्रिका तयार केल्या आहेत. सुमारे २४ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शेख यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यापूर्वी राज्य/ राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे.
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आणि महिला शिक्षक दिनाचे औचित्य साधून शेख यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. आपल्या बालतंत्रस्नेही चळवळ पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी संगणक साक्षरतेची मोहिम सुरू केली. आता दिशादर्शक तंत्रस्नेही चळवळीचे नेतृत्व करीत त्यांनी स्मार्ट कृतिपत्रिकांसाठी २० शिक्षकांची गट तयार केला. त्यातून दररोज शिक्षकांना कृतिपत्रिकेत दजेर्दार ई- साहित्य दिले जाते. या कृतिपत्रिकांना पालक व विद्यार्थ्यांकडून पसंती मिळत आहे.
कोरोना काळात शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे शेख यांनी दानशूरांकडून काही विद्यार्थ्यांना एनरॉईड मोबाईल उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांबरोबर ऑनलाइन गप्पा मागण्याबरोबरच त्यांनी स्वत: च्या यूट्युब चॅनेलद्वारे ई-साहित्य सुमारे ११ हजार विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत पोहोचवले, गुगल मिटद्वारे ऑनलाईन शाळा व अभ्यास तपासण्याचे उपक्रम शाळेत राबविले.
कोरोना काळात शेख यांनी विविध उपक्रमामार्फत विद्यार्थी व पालकांना तंत्रस्नेही बनवले. त्यात पाढे पाठांतर, शेतातील कविता, रांगोळी, बालगीते, गायन स्पर्धा, नृत्याविष्कार, चित्रकला स्पर्धा, कोरोना पासून बचावासाठी विद्यार्थी वॉरिअर्स निर्माण केले. गणितातील गोष्टी, शब्दसाखळी, विविध विषयावरील शैक्षणिक व्हिडिओ बनवले. त्यांच्या या विविध उपक्रमाचे शिक्षण अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.