घरच्या घरी करू या बाप्पाची सजावट दीपमाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:15 AM2021-08-20T04:15:39+5:302021-08-20T04:15:39+5:30
लवकरच गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन होणार आहे. या वर्षी कोरोना असल्याने सामान्यांना बाहेर कोठे जाता येत नाही. त्यामुळे बाप्पाच्या ...
लवकरच गणपती बाप्पाचे थाटामाटात आगमन होणार आहे. या वर्षी कोरोना असल्याने सामान्यांना बाहेर कोठे जाता येत नाही. त्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी कोणती सजावट करावी असा प्रश्न पडत आहे.
दीपमाळेचे साहित्य : ताटली, शहाळे, दुधी भोपळा, सोनेरी किंवा चंदेरी पेपर, सुगंधित फुलवाती, फेव्हिकॉल, सुरी, काडेपेटी, पोहे खायचे चमचे.
कृती : प्रथम बाजारातून शहाळे-२, दुधी भोपळे-२, सोनेरी किंवा चंदेरी कागद, फुलवातीचे पाकीट, फेव्हिकॉल या वस्तू विकत आणाव्यात.
प्रथम दोन्ही शहाळ्यातील पाणी पिऊन घ्यावे. शहाळ्याच्या तळाला सुरीच्या साहाय्याने असा छेद द्यावा, जेणेकरून शहाळे ताटलीत व्यवस्थित बसेल. जिथून शहाळाचे पाणी आपण स्ट्रॉने पितो तो छेद सुरीच्या साहाय्याने मोठा करावा. त्यामध्ये दुधी भोपळ्याचा मोठा भाग घट्ट बसायला हवा.
आता शहाळ्याला आणि दुधी भोपळ्याला सोनेरी किंवा चंदेरी कागद फेव्हिकॉलचे साहाय्याने चिकटवा. त्यावर इतर रंगीत टिकल्या लावाव्यात. यामुळे दीपमाळ अधिक आकर्षक दिसेल. यानंतर दुधी भोपळ्याच्या लहान भागाजवळचे देठ कापावे.
घरातील सहा चमचे (पोहे खायचे चमचे) घ्यावेत. ते दुधी भोपळ्यात खोवावेत. त्या प्रत्येक चमच्याच्या पसरट भागावर सुगंधित फुलवात ठेवावी. त्या सर्व फुलवाती काडेपेटी वापरून प्रज्वलित कराव्यात.
आता आपली दीपमाळ घरच्या घरी तयार झाली. अशा तऱ्हेने दोन दीपमाळा तयार करून बाप्पाच्या शेजारी ठेवल्या तर त्याची सजावट रात्रीच्या वेळेस आकर्षक दिसते.
- मनोहर जोशी, पुणे