वढू बुद्रुकला ऐतिहासिक क्षेत्र बनवू
By admin | Published: March 28, 2017 02:02 AM2017-03-28T02:02:16+5:302017-03-28T02:02:16+5:30
शंभू छत्रपतींनी देश, धर्म अन् समाजासाठी केलेले बलिदान आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. शंभू छत्रपतींच्या
कोरेगाव भीमा : शंभू छत्रपतींनी देश, धर्म अन् समाजासाठी केलेले बलिदान आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. शंभू छत्रपतींच्या समाधिस्थळाचा विकास आजही मोठ्या प्रमाणावर झाला नसल्याने कर्तव्याची जाणीव ठेवून मुख्यमंत्री निधी व जिल्हा नियोजनमधून समाधिस्थळाचा विकास पुढील वर्षापर्यंत करतानाच श्रीक्षेत्र वढू बुद्रुक ऐतिहासिक तीर्थक्षेत्र बनवून शंभू छत्रपतींना अभिवादन करणार आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीमहाराजांच्या ३२८व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त शंभू छत्रपतींच्या समाधी व पूर्णाकृती पुतळ्याची शासकीय पूजा पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पार पडली. या वेळी आमदार बाबूराव पाचर्णे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसीलदार राजेंद्र पोळ, सभापती सुभाष उमाप, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, संजय जठार, सविता बगाटे, सविता पऱ्हाड, साहेबराव भंडारे, अंकुश शिवले, सरपंच रेखा शिवले, संजय शिवले, संतोष शिवले, नवनाथ गुंडाळ, रमेश शिवले, सचिन भंडारे, सुनीता भंडारे, निर्मला आरगडे, तानाजी इसवे आदी उपस्थित होते.
गिरीश बापट म्हणाले, की जगाच्या इतिहासात निष्ठेने देश, धर्म व समाजासाठी प्राणाचे बलिदान देणारे संभाजीमहाराज हे एकमेवाद्वितीय उदाहरण असल्याने जिल्हाधिकाऱ्यांची वढू बुद्रुकमध्ये बैठक घेणार आहे. शंभू छत्रपतींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून श्रीक्षेत्र वढू बुद्रुक ऐतिहासिक तीर्थक्षेत्र बनविण्याचा संकल्प बलिदान स्मरणदिनापासून करणार असल्याचे सांगत शंभू छत्रपतींचे उपासक असल्याने समाधिस्थळावरून प्रेरणा घेऊन वाटचाल करू.
पाचर्णे म्हणाले की, शंभू छत्रपतींच्या बलिदान मासानिमित्त मूक पदयात्रा काढण्यात येत असल्याने मूक पदयात्रा मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याबरोबरच धर्मसभेसाठी २५ लाखांचा सभामंडप बनविण्यावर भर देणार आहे. कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी औद्योगीक कारखान्याची मदत घेऊन रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे काम हाती घेण्याबरोबरच वढू-तुळापूरला ‘ब’ दर्जाच्या तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव देण्यासाठी सादर करण्यात आला असून शासनाच्या बजेटमध्ये विशेष तरतूद करुन ऐतिहासिक तीर्थक्षेत्र बनविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)