पुन्हा एकदा रंग असा चढू दे खेळाला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:11 AM2021-07-28T04:11:01+5:302021-07-28T04:11:01+5:30
रंगभूमीवरच्या कलाकाराचं स्वप्नं असतं की,आपल्या कलेला मूर्तरूप प्राप्त होऊन तिला रसिकांसमोर सादर करण्याची संधी मिळावी. मग त्यात टीका असो ...
रंगभूमीवरच्या कलाकाराचं स्वप्नं असतं की,आपल्या कलेला मूर्तरूप प्राप्त होऊन तिला रसिकांसमोर सादर करण्याची संधी मिळावी. मग त्यात टीका असो वा कौतुक दोन्हीही त्याच्यासाठी फार महत्त्वाचा भाग असतो. रसिक वा परीक्षकांच्या टीकेला तो सकारात्मकरित्या घेऊन आणखी चांगलं देण्यासाठी प्रयत्न करतो तर कौतुकाने हुरळून न जाता कष्टाचं सार्थक झाल्याचा ‘फील’ फक्त घेतो. पण त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि उल्लेखनीय बाब म्हणजे कला रंगभूमीवर सादर होणं असते. पण कोरोनाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कला प्रांतातला मार्ग खडतर झाला आहे.
कोरोना संकटाचा औद्योगिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक यांसारख्या सर्वच क्षेत्रावर दूरगामी परिणाम झाला आहे. त्याला सिनेमा किंवा नाट्य क्षेत्र देखील अपवाद ठरलेले नाही. या क्षेत्रातील निर्माता, तंत्रज्ञ, कलाकार अशाच सर्वच घटकांना कोरोनाचा जोरदार फटका बसला. काही कलाकारांवर तर अक्षरश: उपासमारीची वेळ आली. पण यातून सिनेमा किंवा मालिका क्षेत्र काही प्रमाणात सावरत असताना नाट्यक्षेत्र अन् रंगभूमी अद्यापही ‘वेटिंग मोड’वरच आहे. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध स्पर्धांनाही ‘खो’ मिळाला आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाट्य व एकांकिका स्पर्धा करत असतात. या स्पर्धांच्या तयारीसाठी विद्यार्थी काही वर्ष, महिने दिवसरात्र जीव ओतून मेहनत घेत असतात. या स्पर्धांमध्ये आपलं सर्वोत्तम योगदान देण्याकडे तरुण कलाकारांचा कल असतो. या स्पर्धेत मिळणारा अनुभव या सर्व कलाकार मंडळींना समृद्ध करणारा असतो. या स्पर्धांच्या निमित्ताने प्रांत, भाषा, आशय, विषय, सादरीकरण यांच्या वैविध्यपूर्ण मांडणीने नटलेली हे प्रयोग असतात. कलाकारांच्या जीवनातील स्पर्धांमध्ये सादर होणारी ही नाटकं त्यांसाठी ‘स्पेशल’ असतात. मात्र,गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून ‘रंगभूमी’ कोरोनाच्या दुष्टचक्रात अडकल्यामुळे थोरामोठ्यांसह सर्वच कलाकारांना त्याची किंमत चुकवावी लागली आहे. पण यात मोठमोठ्या शहरांसह खेडोपाड्यातील होतकरू तरुण जास्त भरडले जात आहे. त्यांच्या आयुष्यातला अतिशय मौल्यवान टप्पा वाया गेला आहे. हा काळ त्यांच्या आयुष्यात परत येणार नाही. त्यामुळे होणारं नुकसान कसं भरून येईल हे सांगणं तसं कठीण आहे.
परंतु, कलाकार हा नेहमी आशावादी असतो. तो प्रत्येक संकटाला सकारात्मकरित्या घेतो आणि त्यातून मार्ग काढत पुढे वाटचाल करतो. जेव्हा कोरोनामुळे रंगभूमी कुलूपबंद झाली. तेव्हा कलाकारांनी ऑनलाईन पद्धतीने संहिता लेखनासाठीचा विषय, लेखन, वाचन, सराव यांद्वारे सर्जनशीलता संपणार नाही याची काळजी घेतली आहे. पण एक समाधानकारक बाब म्हणजे रंगभूमी व नाट्यचळवळ जिवंत ठेवण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर अशा मोठ्या शहरातीलच नव्हे तर गावोगावी कलाकार मंडळी प्रयत्नशील आहे. अनेक ज्येष्ठ मंडळींनी यात पुढाकार घेतला आहे. यामुळे कोरोना कालावधीत झालेलं तरुण कलाकाराचं नुकसान कदापि भरून येणं शक्य नसलं तरी ते कमी होण्यास हातभार मात्र नक्की लागणार आहे.
- दीपक कुलकर्णी