‘पीएमपी’चे १७८ कर्मचारी परत द्या
By admin | Published: April 11, 2017 03:37 AM2017-04-11T03:37:24+5:302017-04-11T03:37:24+5:30
पुणे महापालिकेला दणका दिल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करणाऱ्या पीएमपीच्या १७८ कर्मचाऱ्यांनाही परत बोलाविले आहे.
पुणे : पुणे महापालिकेला दणका दिल्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करणाऱ्या पीएमपीच्या १७८ कर्मचाऱ्यांनाही परत बोलाविले आहे. पीएमपी प्रशासनाने याबाबतचे पत्र सोमवारी पालिका आयुक्तांना दिले आहे. दोन दिवसांत हे कर्मचारी कार्यमुक्त करावेत, असे पत्रात नमुद करण्यात आल्याचे समजते.
पीएमटी व पीसीएमटीचे २००७ मध्ये विलीनीकरण होवून पीएमपीची निर्मिती झाली. त्यावेळी पीएमटी व पीसीएमटीचे काही कर्मचारी अनुक्रमे दोन्ही पालिकांमध्येच कार्यरत राहिले. तेव्हापासून आजतायगायत हे कर्मचारी पीएमपीऐवजी पालिकांचीच चाकरी करत होते. पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पीएमपी सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. बेशिस्त कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यापासून निलंबित करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. भांडार व्यवस्थापकांचे निलंबन करून त्यांनी अधिकाऱ्यांनाही एकप्रकारे इशारा दिला आहे. तसेच पुणे पालिकेत कार्यरत असलेल्या पीएमपीच्या ८३ कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. आतापर्यंत एकाही अधिकाऱ्याने हा निर्णय घेतला नव्हता. पुणे पालिकेनंतर मुंढे यांनी आता पिंपरी चिंचवड पालिकेला दणका दिला आहे. पालिकेत काम करणाऱ्या १७८ कर्मचाऱ्यांना त्यांनी परत सेवेत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रशासनाने याबाबतचे पत्र सोमवारी पालिका आयुक्तांना पाठविले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये १७३ कर्मचारी हेल्पर व क्लीनर या पदावरील असून ५ चालक आहेत. मात्र, १७३ कर्मचारी पालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये लेखनिक तसेच इतर कामे करीत आहेत. पालिकेच्या रुग्णालयांमध्येही काही कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे वेतन मात्र पालिकाच देत असल्याचे समजते. या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत मुक्त करावे, असे प्रशासनाने दिलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)