दाखला हवाय.. शाळेची सायकल परत द्या
By Admin | Published: June 28, 2015 12:35 AM2015-06-28T00:35:30+5:302015-06-28T00:35:30+5:30
साहित्य खरेदीतील गैरव्यवहार, आजी-माजी अध्यक्षांचे लाचखोरी प्रकरण या मुळे महापालिकेचे शिक्षण मंडळ चर्चेत असतानाच; आता पालिकेची शाळा
पुणे : साहित्य खरेदीतील गैरव्यवहार, आजी-माजी अध्यक्षांचे लाचखोरी प्रकरण या मुळे महापालिकेचे शिक्षण मंडळ चर्चेत असतानाच; आता पालिकेची शाळा सोडून इतर खासगी शाळेत प्रवेश घेतला म्हणून, विद्यार्थिनीला देण्यात आलेली सायकल परत मागण्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या वडगावशेरी येथील आनंदॠषी शाळेत घडला आहे. विशेष म्हणजे या सायकली राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने वाटलेल्या असल्याने त्याचा शाळेशी काहीही संबंध नसताना , शाळेकडून या विद्यार्थिनीला दाखला देण्यासाठी सायकल परत मागण्यात आली. शिवानी संतोष देवदास असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
शिवानी ही वडगावशेरीतील राष्ट्रसंत आचार्य आनंदॠषीजी महाराज प्राथमिक विद्यालयात शिक्षण घेत होती. या वर्षी ती चांगल्या गुणांनी सातवी पास झाल्याने तसेच या शाळेत आठवीचे वर्ग नसल्याने, तिचे वडील संतोष देवदास यांनी शिवानीचे नाव याच परिसरात असलेल्या लोणकर माध्यमिक विद्यालयात घातले. दरम्यान, शाळा सुरू होण्याच्या दिवशी म्हणजे, १५ जून रोजी शिवानीच्या वर्गशिक्षिकांचा फोन तिच्या वडिलांना आला. तुमच्या मुलीचे शैक्षणिक साहित्य द्यायचे असल्याने तिला शाळेत घेऊन या,असे सांगण्यात आले. या वेळी संतोष यांनी शिवानीचा प्रवेश दुसऱ्या शाळेत घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर शाळेकडे तिच्या दाखल्याची मागणी केली. त्यानंतर आठ दिवसांनी शाळेकडून संतोष यांना फोन करून दाखला हवा असेल, तर आधी सायकल जमा करा, असे सांगत, तिच्या वडिलांनाच फैलावर घेतले. त्यानंतर देवदास यांनी मुख्याध्यापिकांशी संपर्क साधला असता, देवदास यांचीच कानउघाडणी करण्यात आली. त्यामुळे शिवानीच्या पालकांना धक्काच बसला.
कोणाची सायकल... जोर कोणाचा ?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्ताने शरद कला आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ७३ गुणवंतांना या सायकली वाटण्यात आल्या होत्या. त्यात एक सायकल शिवानीलाही मिळालेली होती. त्यामुळे खासगी संस्थेकडून मिळालेली सायकल शिक्षण मंडळ कसे मागते, याबाबत शिवानीच्या पालकांनाही धक्का बसला. ही सायकल मिळून दोन वर्षे झाली असताना, ती आता दाखल्यासाठी का परत मागत आहेत. या प्रश्नाने शिवानीचे पालकही चक्रावून गेले होते.
शाळांचा पट वाढविण्यासाठी उद्योग ?
-शिवानीची सायकल परत मागण्यामागे शाळेचा पट वाढविण्याचा प्रकार असल्याचे यावरून निदर्शनास येत आहे. या शाळेत मुलांची संख्या कमी असतानाही, लोक प्रतिनिधींच्या आग्रहास्तव या शैक्षणिक वर्षापासून या शाळेत आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र, आता त्यासाठी विद्यार्थी संख्या कमी आहे. त्यामुळे शाळेतून सातवीचे विद्यार्थी बाहेर न जाताच आपल्याच शाळेत असावेत, यासाठी शिक्षकांची तसेच मुख्याध्यापकांची धडपड सुरू आहे. त्यामुळे पालकांना अथवा विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या धमक्या देऊन अथवा त्यांना बळजबरीने आपल्या मुलांना याच शाळेत ठेवावे यासाठी बळजबरी केली जात आहे.
या शाळेत आठवीचे वर्ग नसल्याने आम्ही दुसऱ्या शाळेत शिवानीचा प्रवेश घेतला होता. मात्र, त्यासाठी सायकल परत मागणे चुकीचे आहे. ही सायकल शिक्षण मंडळाने दिलेली नाही. आम्ही शाळेकडे तक्रार केल्यानंतर अखेर शाळा दाखला देण्यास तयार झाली असून, हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही बाब कोणाशीही घडू नये.
- संतोष देवदास (शिवानीचे पालक)