बापरे काय ही गर्दी! कोरोनाला विसरून आंदोलन; बैलगाडा शर्यत चालू करूद्या, अन्यथा पुणे - मुंबई महामार्ग बंद करू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 04:13 PM2021-08-11T16:13:43+5:302021-08-11T16:13:50+5:30
वडगाव मावळ येथे बैलगाडा संघटनेचे आंदोलन, येत्या पंधरा दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
वडगाव मावळ : बैलगाडा शर्यत चालू करावी व इतर मागण्यांसाठी मावळ तालुका बैलगाडा संघटनेच्या वतीने मोर्चा काढून वडगाव येथील पंचायत समिती चौकात आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्व पक्षीय पदाधिकारी सहभागी झाले होते. येत्या पंधरा दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करून द्रुतगती महामार्ग बंद करण्यात येईल असा ईशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे यांच्यासह गाडा मालकांनी दिला.
वडगाव येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात बैलगाडा मालकांची बैठक झाली. त्यानंतर मोर्चा काढण्यात आला. परंतु याठिकाणी कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडवल्याचे चित्र दिसून आले.
शेतक-यांना बैलजोडी व बैलगाडी खरेदीसाठीचे अनुदान सन २०१६-१७ च्या आदेशाची अंमलबजावणी करून मिळावी. संविधान कलम ४८ प्रमाणे शेतक-यांच्या जुंपणीची यादी जाहिर करावी. जनावरांच्या वंशवृध्दीसाठी शासन मान्य प्रदर्शन भरवावे. बैलाच्या व्यायामासाठी पळणे, पोहण्यास परवानगी द्यावी, बैलाची शारिरिक क्षमता धावण्याची सिध्द करून तो पळू शकतो का याचा परिक्षक अहवाल तयार करावा, धावण्याची क्षमता सिध्द झाल्यास पारंपारीक बैलाची मैदाने खेळ योग्य नियम व अटी लावुन चालू करावीत, बैल, गाय वासरू कत्तलखान्यात कापण्यासाठी परवानगी देऊ नये.
वरील मागण्या व सुप्रीम कोर्टातमध्ये बैलगाडा शर्यत बंदी असलेली केस या संदर्भात सरकारने लक्ष घातले नाही तर येत्या १५ दिवसात राज्यव्यापी आंदोलन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग करण्यात येईल असा ईशारा या वेळी देण्यात आला. या वेळी तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी मावळ तालुका बैलगाडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे, सुधाकर शेळके, संदिप शेळके, रामनाथ वारिंगे, यांच्या सह मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर भागातील गाडा मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.