संचारबंदीचा लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:12 AM2021-04-04T04:12:22+5:302021-04-04T04:12:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदीसारखे कडक पाऊल उचलले असले, तरी त्याची अंमलबजावणी करताना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदीसारखे कडक पाऊल उचलले असले, तरी त्याची अंमलबजावणी करताना नागरिकांना त्याचा कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये, याविषयीच्या सूचना सर्वांना दिल्या आहेत. या बाबीकडे पोलीस अधिक संवेदनशीलतेने पाहणार आहेत. महापालिकेच्या आदेशात जोपर्यंत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत कोणाचीही अडवणूक करण्यात येणार नाही, असे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
पुणे शहरात शनिवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, त्याविषयी महापालिकेच्या आदेशात पुरेशी स्पष्टता दिसून येत नाही. सायंकाळी ६ ते सकाळी ६ याकाळात बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांनी नेमके काय करायचे, त्याचबरोबर पुण्यातून बाहेर जाणाऱ्र्यांनी काय करायचे. याविषयी स्पष्टता नसल्याने लोकांचा गोंधळ उडाला आहे. बाहेर गावाहून येणाऱ्र्यांना घरी जाण्यासाठी वाहन मिळेल का, त्यांना घेऊन येण्यासाठी जर कोणी घरातून बाहेर पडला तर त्याला अडविणार का असे असंख्य प्रश्न पुणेकरांच्या मनात महापालिकेच्या आदेशाने निर्माण झाले आहेत.
याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, शहरात ज्या वेगाने शहरात कोरोनाचा प्रसार होतोय, तो रोखण्यासाठी, त्याला अटकाव घालण्यासाठी संचारबंदीचा पर्याय निवडला आहे. आज पहिल्या दिवशी बहुतांश पुणेकरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे. बहुतांश दुकाने, व्यापारी पेठा सायंकाळी ६ वाजण्याच्या आत बंद झाल्या.
पोलिसांनी सायंकाळी ४ वाजल्यापासूनच संचारबंदीबाबत पोलीस व्हॅनवरील पी ए सिस्टिमद्वारे अनाऊसमेंट करायला सुरुवात केली होती. तसेच शहरातील ९६ महत्वाच्या चौकात बॅरिकेड लावून नाकाबंदी सुरु केली आहे.
या संचारबंदीचा उद्देश विफल करणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना संचारबंदीची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची, याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामावरुन घरी परत जाणाऱ्यांची कोणतीही अडवणूक करण्यात येणार नाही़ मात्र, त्याने स्वत: जवळ योग्य ओळखपत्र, जेथे काम करतात, त्या ठिकाणचे प्रमाणपत्र जवळ बाळगावे.
हॉटेल, रेस्ट्रॉरंट बंद असल्याने एकत्र येण्याचे प्रमाण सायंकाळी सहानंतर कमी असणार आहे. तातडीच्या कामासाठी लोकांना बाहेर पडायला परवानगी देण्यात येणार असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले.
मेट्रो, बांधकाम साईटवर अनेक असंघटित मजूर, कामगार काम करीत असतात, त्यांनी आपल्या कामगारांना पत्र द्यावे, असे आवाहन आम्ही केले आहे. तसेच आज पहिलाच दिवस असल्याने लोकांना समजावून सांगणे, जनजागृती करणे यावर भर देण्यात येणार असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले.
......
सायंकाळी ६ नंतर बाहेर पडायचे असेल तर हे जवळ बाळगा
* अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जवळ बाळगा.
* रुग्णालयात जायचे असेल, रुग्णाला भेटायचे असेल तर त्याच्याशी संबंधित कागदपत्र, डॉक्टरांचे, हॉस्पिटलचे पत्र जवळ ठेवा
* बाहेरगावी जायचे असेल तर संबंधित गाडीचे तिकीट जवळ बाळगा.
* कामावरुन उशिरा घरी जावे लागणार असेल तर जेथे काम करता त्या ठिकाणचे ओळख पत्र, कंपनीचे उशिरापर्यंत कामावर थांबावे लागत असल्याचे पत्र जवळ ठेवा.
* पत्र नसेल तर वरिष्ठांचा व्हॉटसअॅप मेसेज चौकशी केली तर दाखवा.
* जवळच्या गावातून कामानंतर घरी परत येत असाल, तसे कंपनीचे पत्र जवळ बाळगा.
..........
प्रसंगी पोलीस वाहनांनी घरी पोहोचवू
संचारबंदी काळात वैध कारणासाठी लोकांना बाहेर पडायला परवानगी देण्यात येणार आहे. अगदीच कोणाची अडचण असेल तर प्रसंगी पोलीस वाहनांमधून त्यांना योग्य त्या ठिकाणी पोहचवले जाईल. मात्र, कोणाची अडचण होऊ देणार नाही, अशी ग्वाही डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.