नद्यांना स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू या : अतुल किर्लोस्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 03:46 PM2021-01-09T15:46:02+5:302021-01-09T15:46:11+5:30
राम नदी महोत्सवाचे ऑनलाइन उद्घाटन
पुणे : पाणी हा हृदयाच्या खूप जवळचा विषय आहे. त्यामुळे राम नदीचे पुनरूज्जीवन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही थेट तरूणांना यात सहभागी करून घेण्याचे ठरवले. महाविद्यालयांमध्ये जाऊन कार्यक्रम सुरू केले. त्यानंतर राम नदीकाठी जाऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात केली, नदीला तिचे वैभव परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन उद्योजक अतुल किर्लोस्कर यांनी केले.
पहिला ‘राम नदी महोत्सव दि. ८ ते १० जानेवारी दरम्यान ऑनलाइन होत असून, त्याला आजपासून सुरवात झाली. या पहिल्या ‘राम नदी महोत्सवा’चे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता उद्योजक अतुल किर्लोस्कर यांच्या हस्ते ऑनलाइन झाले.
या वेळी माधव चंद्रचुड (चेअरमन, वसुंधरा किर्लोस्कर फिल्म फेस्टिवल) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महोत्सवाच्या निमंत्रक आरती किर्लोस्कर आणि गौरी किर्लोस्कर आपली भूमिका मांडली. किर्लोस्कर वसुंधराचे महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आहेत. शताक्षी गावडे यांनी निवेदन केले.
आरती किर्लेास्कर म्हणाले,‘‘ राम नदीचे पुनरूज्जीवन करण्याचे आम्ही ठरवले. या नदीला पुर्वीचे वैभव कसे प्राप्त करून द्यायचे, त्यावर काम सुरू केले. यावर काम करून आम्ही त्याचा अहवाल महापालिका संबंधित विभागांना दिला. नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की, त्यांनी त्यांच्या नदी, नाले, तलाव स्वच्छ करण्यासाठी पुढे यावे. त्यामुळे त्यांच्या परिसराचे आरोग्यही चांगले राहील.’’
गौरी किलोर्स्कर म्हणाल्या,‘‘ आम्ही गेल्या वर्षी या राम नदीवर काम सुरू केले. या नदीच्या परिसरात बांधकाम होतेय, कचरा टाकला जातोय. त्यामुळे आम्ही राम नदीला पुन्हा वैभव देण्यासाठी काम सुरू केले. ३० महाविद्यालयात आम्ही पोचलो आणि तिथल्या तरूण-तरूणांना या प्रकल्पाविषयी माहिती दिली. नदीकाठी असलेल्या नागरिकांपर्यंत पोचलो. लाॉकडाऊनमध्ये आम्ही लोकांपर्यंत पोचू शकलो नाही म्हणून ऑनलाइन कार्यक्रम सुरू केला.’’
बावधन झऱ्याचे संवर्धन करा
‘राम नदीचे झरे व नाले’ याविषयी शैलेंद्र पटेल यांनी माहिती दिली. बावधन येथील नैसगिर्क झऱ्याबाबत पटेल म्हणाले,‘‘ बावधन झरा हा कायमस्वरूपी पाण्याचा स्त्रोत आहे. ते जपला पाहिजे. पालिेकेने त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. कारण हे स्वच्छ पाणी आहे. त्यामुळे लाखो लिटर दररोज येणारे पाणी खूप महत्त्वाचे आहे.’’