चला जपूया माय मराठी : मराठी राजभाषा दिनानिमित्त विशेष लेख 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 09:03 PM2019-02-27T21:03:54+5:302019-02-27T21:05:19+5:30

काही इंग्रजी शब्दांचा वापर मुद्दामच केलाय कारण अनेकांना इंग्रजी शब्द अधिक जवळचे असल्याने शुद्ध मराठी शब्द "बाउन्सर" जाण्याचे "चान्सेस" आहेत .तरी क्षमस्व

Let's try to preserve Marathi language : Special article for Marathi language day | चला जपूया माय मराठी : मराठी राजभाषा दिनानिमित्त विशेष लेख 

चला जपूया माय मराठी : मराठी राजभाषा दिनानिमित्त विशेष लेख 

-गायत्री क्षीरसागर 

पुणे :

माझा मराठीची बोलू कौतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

                      -​संत ज्ञानेश्वर​ 

(वरकरणी एवढं मोठा लेख पाहून तुमच्यातील किती लोक लेख वाचतील ह्यावर शंका परंतु जर वाचलाच तर हे वाचून लक्षात घ्यावे कि मी कोणत्याही राजकीय वादाचे किंवा भाषा/ प्रांतवाद ह्यांचे मुळीच समर्थन करत नाही आणि करणार देखील नाही .) 

परंतु हे वाचून निदान तुमच्यातील काही लोकांना आपल्या मातृभाषा "मराठीचा "  केवळ अभिमानच न वाटता त्याचा   इतरांकडून देखील  कसा  मान राखला जाईल,  त्यासाठी प्रयन्त केले जातील  आणि मराठी बाण्याचा पुरस्कारच होईल, असे वर्तन अमलात आणले तर माझ् लिखाण सार्थकी लागले असं म्हणायला हरकत नाही . निदान मराठीची प्रतिमा कधीच कलंकित होणार किंवा इतरांकडून "तुम्ही मराठी लोक हे असेलच , किंवा कुछ काम के नहीं " असं मात्र ऐकून घेतलं जाणार नाही हे मात्र निश्चित !  

(टीप - काही इंग्रजी शब्दांचा वापर मुद्दामच केलाय कारण अनेकांना इंग्रजी शब्द अधिक जवळचे असल्याने शुद्ध मराठी शब्द "बाउन्सर" जाण्याचे "चान्सेस" आहेत .तरी क्षमस्व ) 

          तसे माझे शालेय शिक्षण हे मराठी शाळेमध्ये झाले , बऱ्याचदा वाटायचं कि कदाचित इंग्रजी शाळेत शिकता नाही आल्याने पुढे आपल्या बऱ्याच संधी कमी होतील , बरेचसे मित्र - मैत्रिणी हे इंग्रजी शाळांमध्ये जाताना पाहून, त्यांच्यातील संवाद ऐकताना पाहून जरा ओशाळ्यासारखं व्हायचं , कदाचित आपण कधीच इंग्रजी बोलू शकणार नाही का , आपण सतत मागे राहणार का , अशी माझ्या सारख्या अनेक मराठी शाळेत शिकणाऱ्या लोकांची अवस्था असेलही . त्यात जन्म हा पुण्यातला असल्याने मराठी बाणा हा रक्तात लहानपणापासूनच होता , आईचे  माहेर  पेठेमधील असल्याने बरेचसे संस्कार हे पेठेतीलच झाले, त्यात वडील मुंबईचे असल्याने "कॉस्मोपॉलिटन" पणा आत्मसात करण्याची "फ्लेक्सिबिलिटी" देखील होतीच .  मला  वाचनाची मुळातच   आवड असल्याने भाषा शिकणं तसं काही कठीण गेलं नाही. जोडीला  संस्कृत केवळ मार्क वाढतील ह्या अपेक्षेने मुळी घेतलंच नव्हतं .  तसं अगदी पाचवी सहावी पासूनच विज्ञानक्षेत्रात शिक्षण घ्यायचं हे मनाशी ठाम केल्याने पुढे विज्ञान आणि गणित मात्र इंग्रजीमध्ये शिकले. अडले मात्र कुठेच नाही आणि आज जेंव्हा मराठी असो किंवा इंग्रजी ह्यांच्या मध्ये स्वतःचे विचार तेवढ्याच खंबीर आणि उघडपणे , मी केवळ मांडलेच नाही तर विविध वर्तमानपत्रात किंवा मासिकात झळकलेदेखील, हे वाचून त्यावर अनेकांची स्तुतीसुमने असो किंवा टीका हे देखील ऐकल्या  , परुंतु हे सर्व पाहून आज मला निदान एक भाषा  व्यवस्थित  येते आणि त्याच्या जोरावर आपण बरीच मजल मारू शकतो ह्याचा आत्मविश्वासदेखील आहे. आज हे सगळं पाहून माझ्या आई वडिलांच्या मला मराठी शाळेत प्रवेश घेण्याच्या निर्णयाचा  मला  नक्कीच अभिमान आहे.

              एका छोट्याशा गावातून , ह्याच मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलीने लंडनमध्ये जाऊन तेथील विविध देशांतील तरुण- तरुणींशी संवाद साधला, तेंव्हा असं जाणवल कि आपणच लोकांनी "इंग्रजी " भाषेचा खूप बाऊ केलाय , जर्मनी असो किंवा स्पेन, फ्रांस मधील लोक, ते त्यांच्या भाषेचा कित्येक पटीने जास्त अभिमान बाळगतात. त्यांच्या मानाने आपलं इंग्रजी व्याकरण हे कित्येक पटीने बरं म्हणायला हवं . पण ह्याच त्यांना कमीपणा नव्हे स्वतःच्या मातृभाषेचा अभिमान कित्येक पटीने मोठा वाटतो आणि तो असायलाच हवा हे त्यांनी कित्येकदा पटवून दिलं . जाताना मात्र "नमस्ते" हा शब्द शिकायला देखील ते विसरले नाही हे मात्र खरं . असाच अनुभव थायलंड मध्ये देखील आला. तेंव्हा आपल्या पेक्षा आपल्या संस्कृतीचा, परदेशी लोकांनाच जास्त अप्रूप , कदाचित त्यांना त्यांच्या संस्कृतीचे महत्व आणि तिची ऱ्हास व्हायच्या आधी जोपासना करून वाढविणे हे गणित खूप आधीच उमगलं आहे असे वाटते. बरं तुमच्यातील बऱ्याच लोकांना परदेशी लोकांना इंग्रजी न येण्याची बाब पटणारं नाही म्हणूनच अगदी आपलं घरचं उदाहरण देते, बऱ्याचदा दुसऱ्या राज्यांमध्ये प्रवास करताना , आपण "मराठी " लोक किती "फ्लेक्सिबल" आहोत ह्याची प्रचिती येते , म्हणजे दुर्दैव एवढं कि दोन मराठी व्यक्ती भेटल्यावर केवळ स्टाईल किंवा जरा जास्त "सोफिस्टिकेटेड" वाटेल म्हणून बरेच जण इंग्रजी किंवा हिंदी भाषेत संवाद साधतात आणि नंतर मराठी भाषेचा ह्रास होतोय, मराठी लोक मागे पडतात म्हणून बोंब मारायची. हि आपल्या लोकांची सवय मात्र जायची नाही. 

              दुसऱ्या राज्यांमध्ये मुख्यतः जेंव्हा मी दक्षिण भारतात (साऊथ इंडिया बरं ) , तेंव्हा प्रामुख्याने हा फरक अधिक जाणवला, ह्याविषयी आज मात्र "मराठी भाषा"  दिनानिमित्त लिहावेस वाटलं हे खरं . तेथील लोक हिंदी आणि इंग्रजी कळत असून देखील त्यांना काही कळत नसल्याचा जणू "आवच" आणतात, कधीही तेथील “लोकल”  लोक तुम्हला बहुदा त्यांच्याच भाषेमध्ये संवाद साधून , तुम्हला हिंदी / इंग्रजी विसरायला भाग पाडतील  किंवा ते "एन्टरटेन " देखील करणार नाही, बाजारात जाऊन "घासाघीस करणे " तर विसरूनच जा. मला प्रवास करताना लोकांशी संवाद साधणे , तेथील संस्कृतीचे बारकाव्याने निरक्षण करणे अधिक आवडते म्हणून मी बऱ्याच राज्यांमध्ये  "पब्लिक ट्रान्सपोर्ट " ने फिरणे पंसत केलं. अगदी काही राज्य सोडली तर तेथील ठिकाणांची नावं , बोर्ड (फलक ) किंवा अनोऊन्समेंट हि देखील त्यांच्या लोकल भाषेमध्येच व्हायची , सर्व प्रकारात कित्येकदा समोरून बस गेली , तर समजलं नाही. जेंव्हा असा प्रवास करून  पुण्यात परत आल्यावर  अगदी कटाक्षाने ठरवलं , काही होऊ आपल्या राज्यात तरी का आपण एवढं फ्लेक्सिबल  का  राहायचं आणि जो येईल त्याला मराठी सोडून बाकी भाषांमध्ये एन्टरटेन  का  करायचं तर , आपलीच तंगडी आपल्या गळ्यात कशी पाडावी ह्याच आणखी एक अनुभव आला , औन्धच्या पेट्रोलपंपावर , पेट्रोल भरताना , मी मराठीत बोलत असताना तेथील मराठी कर्मचारी मात्र हिंदी मध्ये उत्तर देताना ऐकून मात्र माझं डोकंच फिरलं , जाता जाता, म्हंटलं देखील मी मराठी आहे, आणि तुम्ही देखील मग हा हिंदी - मराठी संवाद कशासाठी, मराठीच बोललं तर बार होईल , तर ह्या औन्धच्या "गायकवाडाच्या " मराठी कर्मचाऱ्याचे उत्तर डोक्यात सणक आणणारे होते, "क्या होतंय मॅडम हिंदी बोलनेसे , हिंदी तो सब जगह बोलती है , थोडी स्टाईल में लगती है  ! " आप हिंदी बोलो .  हे ऐकून तेथील मालकाला तक्रार करून त्या पेट्रोल पंपावर कित्येक महिने मी बहिष्कार घातला.  एवढ्यावर आपण थांबवू तर मराठी कसले , कोणताही दुकानात जावो, "कांदा कैसे दिया" असं चुकीचे असले तरी विचारणारे कित्येक लोक तुम्हाला भेटतील किंवा रिक्षा असो किंवा कॅब ह्यात बसल्यावर "डेक्कनसे उजवीकडे जरा टर्न लेना " असे म्हणणारे लोक इ असतील . अरे पण का जर मराठी भाषेच्या व्याकरणाचे धडे नीट न घेता दुसऱ्या भाषांची चिरफाड का ? आधी शुद्ध मराठीत बोलायला शिका आणि निदान दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर अधिक करायला शिका .आणखी बोलायचे झाले तर माझे शिक्षण एका "नॅशनल रिसर्च इन्स्टिटूट मध्ये झाले आणि  सध्या  नोकरीदेखील अशाच संस्थेत "आऊटरिच " विभागात करत आहे.

                हे वाचून तुम्हला अंदाज आला असेल कि माझ्या आजू बाजूला देशभरातील नव्हे तर कधी कधी काही मिटींग्स , कार्यशाळा किंवा कॉन्फरन्स ह्या ना त्या निमित्त्याने विविध लोकांशी संपर्क झाला .येथील लोक, कल्चर इत्यादी खूप जवळून पाहिलं , त्यात बऱ्याचदा केवळ एकाच प्रातांमधून आहे किंवा एक भाषा "कॉमन दुवा " आहे हे समजतात, तेंव्हा हे लोक दुसऱ्या वाक्यापासून त्यांच्या मातृभाषेत संवाद साधू लागतात हे पाहून त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे हे मात्र खरं  ! तसेच त्यातील बरेच लोक येथे येऊन मराठी शिकण्याचा प्रयत्न देखील करतात अगदी ढोल ताशा पथकांमध्ये तेवढ्याच हिरीरीने सहभाग नोंदवितात, हे पाहून अभिमान देखील वाटतो. मागील वर्षी मी फ्रेंच शिकत असताना देखील तेवढीच मजा आली आणि लक्षात आल , ह्या जगात अफाट ज्ञान आहे त्यामुळे कितीही भाषा शिकलं तरी कमीच असेल पण शक्य तेवढं ते वाचून आत्मसात करणे गरजेचे आहे. 

                  अगदी बंगलोरमध्ये असताना तेथील कन्नड मधील फलक हे इंग्रजी पेक्षा कित्येक पटीने मोठे असल्याचे पाहून तेथे जन्म होऊन, शिक्षण झालेली पण आज पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या माझ्या मैत्रिणीने  , "पुण्यात किंवा महाराष्ट्रात असे मराठी मध्ये बोर्ड का नाहीत असे विचारले असता मी निरउत्तरितच झाले . आज हि जे परप्रातीयांना कळलं ते आपल्या मराठी व्यायसायिकांना , हॉस्पिटल , मेडिकल , शाळा , कॉलेज ह्या सारख्या संस्थांना का कळलं नाही हे मला पडलेले कोड आहे . मराठी म्हणून , केवळ मराठी - मराठी असंच करून मोर्चे काढा हे माझं मुळीच म्हणणे नाही. परंतू  जर आपणच आपली भाषा,  संस्कृती ह्यांची लाज वाटते म्हणून दुर्लक्ष केलं आणि पुढे मग कुठेना कुठे डावलले गेलो तर इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. 

                   महाराष्ट्रा आता कॉस्मोपॉलिटन झालाय ,  येथील शहरे विस्तार पावत , परप्रांतीयांना आपलंस करून त्यांना देखील रोजगार उपलब्ध करून देऊ लागले आहेत . त्यामुळे  हिंदी , इंग्रजी येणे हे जसं  अगदी "मस्टच" आहे तसं मराठी शिक्षण , शिकविणे आणि त्याचा सन्मान राखणे आणि आधी स्वतःकडून आणि नंतर लोकनांकडून "मराठी भाषेची" उपेक्षा होऊ नये ह्याची खबरदारी घेण्याचा काम , आपल्या सर्वांचाच आहे. त्यामुळे हिंदी / इंग्रजी चा सोफिस्टिकेडपणा  जरा दूर ठेवून निदान आपल्या लोकांशी मराठी मध्ये बोला आणि स्वतः सोबत  ,  इतरांनादेखील आपल्या साहित्य , कला , परंपरा ह्यांची ओळख करून द्या . भाषा ही  पाण्यासारखी आहे , ती विविध रंगात मिसळून जाऊन स्वतःची एक वेगळी शैली घडविते . तसेच जस पाण्याशिवाय जगणे अशक्य  आहे तसे भाषेशिवाय ज्ञान मिळविणे देखील अशक्यच .  

सारांश  : भाषा हे माध्यम आहे संवाद साधण्यासाठी , तसं आजकाल दोन व्यक्तींमधील संवाद ही ऱ्हास पावतोय , त्यामुळे भविष्यात भाषेचा वापर संवाद साधण्यासाठी किती होईल यावर शंकाच आहे , परंतु शक्य असेल तेथे मराठी बोला, शक्य असेल तेवढ मराठी वाचा आणि त्याचा पुरस्कार आणि प्रसार करा , मात्र हे करत असताना इतर भाषा देखील शिका , त्यांतील साहित्य , कला , संस्कृती जवळून अभ्यासा आणि तुमच्या ज्ञानांत आणि मनात इतरांच्या संस्कृतीचा मान ठेवा.


(लेखिका : गायत्री क्षीरसागर या युवा लेखिका आहे. )

Web Title: Let's try to preserve Marathi language : Special article for Marathi language day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.