आमच्याच ताकदीवर निवडणुक लढवू अन् जिंकू! फडणवीसांचा पुणे महापालिकेसाठी स्वबळाचा नारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 04:03 PM2021-02-11T16:03:51+5:302021-02-11T16:11:42+5:30
भाजप मनसे युतीच्या चर्चांना दिला पूर्णविराम
पुणे : आगामी काळात पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांसाठी आतापासूनच भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी पुणे शहराचे दौरे वाढवले असून पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत बैठका घेतल्या जात आहेत. मात्र जुना मित्र असलेल्या शिवसेनेने वेगळी चूल मांडल्याने भाजप मनसे युती संदर्भात चर्चांना उधाण आले होते. मात्र भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच आम्हांला कोणाची गरज नाही आम्ही आमच्याच ताकदीवर निवडणुक लढवून जिंकू शकतो असे म्हणत युतीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी (दि. ११) पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, पुणे महापालिकेत आवर्जुन लक्ष घालण्याबाबतानाचा या बैठकीला चंद्रकांत पाटलांच्या अनुपस्थितीबाबत विचारलं असता मी सगळ्या राज्यातच लक्ष घालत असतो. सगळ्याच महापालिकांमध्ये जात असतो. पुण्यात आम्ही अनेक प्रकल्प सुरु केले. त्याचा आढावा घ्यायचा असल्याने महापौरांनी मला पुण्यात आमंत्रित केले. म्हणून मी आलो आहे.
पुण्यातल्या नगरसेवकांच्या कामांबाबत समाधानी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. अर्थात प्रोजेक्ट्सनी स्पीड पकडायला हवा हे सांगायलाही ते विसरले नाहीत. तसेच मी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या कामाबद्दल समाधानी आहे. कामांना आणखी गती देण्याची आवश्यकता आहे. येत्या महापालिका निवडणुकीत आम्हाला नवीन मित्र जोडण्याची गरज नाही, आम्ही स्वबळावर जिंकू असा आत्मविश्वास देखील व्यक्त केला.