फोर्स मोटर्सच्या प्रस्तावावरून बदनामी नको, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना दिले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 01:27 AM2018-07-19T01:27:04+5:302018-07-19T01:27:18+5:30
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी भाजपाचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले पुढाकार घेऊन काही खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविला होता.
पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी भाजपाचे शहर अध्यक्ष योगेश गोगावले पुढाकार घेऊन काही खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविला होता. यामध्ये फोर्स कंपनीने दिलेल्या प्रस्तावावर पीएमपीकडून चार दिवसांत अभिप्राय मागविण्यात आला होता. परंतु याकडे पीएमपीने दुर्लक्ष केल्याचे सांगत गोगावले यांनी यापुढे पीएमपीच्या कोणत्याही प्रस्तावांवर निर्णय घेऊ नका, असे आदेश महापौरांना दिले होते. याबाबत फोर्स मोटर्स कंपनीकडून प्रस्ताव पालिकेला नव्हे तर पीएमपीला देणे आवश्यक होते. परंतु अद्यापही फोर्स मोटर्सकडून
असा कोणताही प्रस्ताव सादर केलेला नाही. त्यामुळे या संदर्भांत नाहक बातम्या निर्माण करून पीएमपीची बदनामी नको, असे लेखी पत्र पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयाना गुंडे यांनी गोगावले यांना दिले आहेत.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरणासाठी शहर भाजपाच्या वतीने विविध उद्योग समुहांकडून प्रस्ताव व सूचना मागविल्या होत्या. या आवाहनाला प्रतिसाद देत फोर्स कंपनीकडून महिन्यापूर्वी पुणे स्टेशन ते कोथरूड, स्वारगेट ते कोथरूड, पुणे स्टेशन ते वडगाव शेरी या तीन
मार्गांवर कंपनीच्या माध्यमातून एसी मिनी बस सेवा देण्याचा प्रस्ताव आयुक्तांना सादर केला होता.
या बसची वारवारंता ७ ते १० मिनिटांची असेल. यामध्ये पीएमपीला कोणतीही गुंतवणूक नसेल, मनुष्यबळाची गुंतवणूक आॅपरेटर स्टेक होल्डरच्या वतीने पुरविले जाणार, तीन महिन्यानंतर रेव्हेन्यू शेअरिंग करण्यात येईल, असा हा प्रस्ताव होता.
यावर चार दिवसांत अभिप्राय देण्याच्या आयुक्तांनी सूचना देऊनदेखील पीएमपी प्रशासनाने कारवाई केली नाही. त्यामुळे पीएमपीच्या कारभारावर नाराज झालेले गोगावले यांनी महापौर मुक्ता टिळक यांना लेखी पत्र देऊन पीएमपीच्या प्रस्तावांवर निर्णय न घेण्यास सांगितले.
पीएमपीसाठी फक्त व फक्तच सीएनजी व इलेक्ट्रीकल बसेसचाच विचार करून वाहतूक सक्षमीकरण करा, असेदेखील स्पष्ट निर्देश दिले आहेत.
त्यामुळे फोर्स मोटर्सच्या प्रस्तावाचे नाहक वृत्तांकन होणे, ही पीएमपीच्या व पालिकेच्या दृष्टीने योग्य नाही, असे स्पष्ट लेखी पत्र गुंडे यांनी गोगावले यांना दिले आहेत.
>योगेश गोगावले यांना लेखी पत्र देऊन सार्वजनिक वाहतूक
व्यवस्था सक्षमीकरणासाठीचा प्रस्ताव अद्यापही फोर्स मोटर्स कंपनीकडून पीएमपीला सादर केलेला नाही. तथापी पालिका आयुक्तांकडून १८ जून रोजी हा प्रस्ताव प्राप्त झाला. त्यानंतर त्वरित २० जून रोजी आयुक्त यांच्यासमवेत चर्चा करून सविस्तर टिपणी सादर केली. या शिवाय २६ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ई-बसेस व फोर्स
मोटर्सबाबात चर्चा केली. या चर्चेत ४०० सीएनजी व १०० डिझेल बसखरेदीबाबत देखील चर्चा झाली. यावेळी यापुढे कोणत्याही परिस्थितीत डिझेल बस खरेदी अथवा भाडेतत्त्वावर न घेण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
- नयना गुंडे, अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी