विस्तारीत मेट्रोसाठी पत्र, आयुक्तांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 03:26 AM2018-01-05T03:26:32+5:302018-01-05T03:26:47+5:30

बहुुचर्चित ‘स्वारगेट ते कात्रज’ या नियोजित मेट्रो मार्गासाठीचा प्रकल्प आराखडा तयार करण्या- साठीचा खर्च महापालिकेने करण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. आयुक्त कुणाल कुमार यांनी लगेचच तसे पत्रही महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठवले आहे.

 Letter for extended Metro, Commissioner's Initiative | विस्तारीत मेट्रोसाठी पत्र, आयुक्तांचा पुढाकार

विस्तारीत मेट्रोसाठी पत्र, आयुक्तांचा पुढाकार

Next

पुणे - बहुुचर्चित ‘स्वारगेट ते कात्रज’ या नियोजित मेट्रो मार्गासाठीचा प्रकल्प आराखडा तयार करण्या- साठीचा खर्च महापालिकेने करण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. आयुक्त कुणाल कुमार यांनी लगेचच तसे पत्रही महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठवले आहे. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी या मार्गासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याबरोबर चर्चा करून पाठपुरावा केला होता.
स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, या मार्गाचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी साधारण ६० लाख रुपयांचा खर्च आहे. या मार्गाची गरज ओळखून व तो आताच होणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन स्थायी समितीने हा खर्च करण्यास मान्यता दिली आहे. भिमाले यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना या मार्गाची मागणी जुनीच असल्याचे सांगितले. एकूण ४४ किलोमीटर अंतराचा मेट्रोमार्ग पुण्यात आहे. त्यातील ३१ किलोमीटरचा मंजूर झाला, त्यानंतर लगेचच नागरिकांकडून विस्तारीत मेट्रो मार्गाची मागणी होऊ लागली. त्यात ‘स्वारगेट ते कात्रज’ हा मार्ग आता सुरू झालेल्या कामातच होणे आवश्यक होते.
त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश बापट यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम यांनाही कल्पना दिली. त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांबरोबर बैठक घेऊन माहिती घेतली व असा मार्ग करणे शक्य असल्याचे मत व्यक्त केले. त्यासाठी सर्वप्रथम प्रकल्प आराखडा तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर आयुक्तांशी चर्चा करून, त्यांना महामेट्रोला पत्र देण्यास सांगितले, अशी माहिती भिमाले यांनी दिली. त्यासाठीच्या खर्चास स्थायीने मान्यता दिल्यामुळे आता प्रकल्प आराखडा तयार करण्यात काहीच अडचण नाही, असे मोहोळ म्हणाले.
दरम्यान, आयुक्त कुणाल कुमार यांनीही याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनीही हा मार्ग होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. सर्वाधिक गर्दी कात्रजहूनच पुण्यात येत असते. स्वारगेटपर्यंत मेट्रो येणारच आहे. तिथून पुढे साधारण ६ किलोमीटर अंतराचा हा मार्ग आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचा ६० लाख रुपयांचा खर्च महापालिका करेल, असे आयुक्तांनी या पत्रात नमूद केले आहे.

‘शिवाजीनगर ते स्वारगेट’ हा मेट्रोमार्ग भुयारी आहे. त्यामुळे ‘स्वारगेट ते कात्रज’ हा मार्ग भुयारी करायचा की उन्नत (रस्त्यावरून) हे प्रकल्प आराखडा तयार करतानाच तांत्रिक योग्यतेनुसार ठरणार आहे. आराखडा तयार झाला की, त्यानंतर तांत्रिक तपासणी होऊन लगेचच कामाला सुरुवातही होऊ शकते. त्यासाठीचा निधी केंद्र व राज्य सरकार देईलच, असा विश्वास भिमाले यांनी व्यक्त केला.

Web Title:  Letter for extended Metro, Commissioner's Initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.