मसापच्या पत्रप्रपंचाची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल
By admin | Published: March 16, 2017 03:49 PM2017-03-16T15:49:01+5:302017-03-16T15:59:41+5:30
पाच लाख पत्र : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी पुण्याचे कार्यवाह विनोद कुलकर्णी यांच्या प्रयत्नांना यश
आॅनलाईन लोकमत
सातारा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या वतीने महाराष्ट्रातून ५ लाख पत्रे पाठविण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातून एक लाख पत्रे पाठविली होती. ह्यमसापह्णच्या पुणेचे कार्यवाह विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात राबविलेल्या या उपक्रमाची दखल दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने घेतली आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, याबाबतचा अहवाल साहित्य अकादमीने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवून दोन वर्षे झाली. फक्त पंतप्रधान मोदी यांच्या सहीसाठी हा निर्णय राहिला आहे. तो त्यांनी त्वरित घ्यावा, यासाठी मसाप, पुणेच्या वतीने महाराष्ट्रातून ५ लाख विनंती पत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठविण्याचा संकल्प केला होता. सातारा जिल्ह्यातून १ लाख पत्रे पाठवून खारीचा वाटा उचलला होता. मसाप शाहूपुरी शाखेच्या वतीने पाठवण्यात येणाऱ्या पत्र उपक्रमाचा प्रारंभ सातारा शहर पोस्ट कार्यालयात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पत्रपेटीत पत्र टाकून झाला. यावेळी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, किशोर बेडकिहाळ, मसाप, पुणेचे कार्यवाह विनोद कुलकर्णी, डॉ. उमेश करंबळेकर, शाहूपुरी शाखेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
मराठी भाषा १० कोटी लोकांची भाषा असून, या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. पत्र पाठवण्याच्या उपक्रमात अनेकांनी सहभाग घेतला होता. यासाठी ठोस कृती कार्यक्रम ठरविला. एका दिवशी २५ हजार पत्रे पाठविली. त्यानंतर १५ दिवसांत उर्वरित ७५ हजार पत्रे पाठविली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून ५ लाख पत्रे पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविली. या पत्रांची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयातील विभागप्रमुख अलोक सुमन यांनी विनोद कुलकर्णी यांना पत्र पाठविले आहे. विनोद कुलकर्णी यांनी पाठविलेली पत्रे मिळाली असून, ती पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविली असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
शरद पवारांनीही साधला संपर्क
माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनीही या उपक्रमाची दखल घेतली असून, त्यांच्या स्वीय सहायकांनी विनोद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर १४ मार्च रोजी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, ह्यमहाराष्ट्रासह राज्याबाहेर सुमारे नऊ कोटी लोक मराठी भाषिक आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. यासंदर्भात पाच लाख लोकांनी आपल्या कार्यालयास पत्रे पाठविली आहेत. याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाली असून, केवळ आपली सही राहिली आहे. मराठी भाषकांच्या भावनांचा आदर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी दखल घेतल्याने त्यांचा आभारी आहे.
- विनोद कुलकर्णी, कार्यवाह, मसाप, पुणे