दाभोलकर खूनप्रकरणी नरेंद्र मोदींना पत्र
By admin | Published: January 20, 2016 11:29 PM2016-01-20T23:29:42+5:302016-01-21T00:22:11+5:30
अविनाश पाटील : सीबीआयच्या ‘एसआयटी’कडून तपास करण्याची मागणी
सातारा : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास गतिमान करण्यासाठी तो सीबीआयच्या एसआयटीकडून करावा, अशा मागणीचे पत्र पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिण्यात आले असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याामध्ये अंनिस कार्यकर्त्यांच्या वतीने हे निवदेन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात येणार आहे,’ अशी माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घृण खून
होऊन २९ महिने पूर्ण झाले. कॉ. गोविंद पानसरे यांचादेखील २० फेब्रुवारी रोजी खुनी हल्लयामुळे मृत्यू झाला. या घटनेलादेखील अकरा महिने पूर्ण झाले. अशापद्धतीने कर्नाटकातील
प्रा. कलबुर्गी यांचाही खून करण्यात आला. कॉ. गोविंद पानसरे खून तपासामध्ये झालेली समीर
गायकवाड या सनातन संस्थेच्या साधकाची अटक आणि त्यावर दाखल झालेले आरोपपत्र सोडता तपासामध्ये फारशी प्रगती नाही, हे अत्यंत वेदनादाई आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिसतर्फे विठ्ठल रामजी शिंदे पुलावर जिथे नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला तेथे तसेच राज्यभर बुधवारी निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र अंनिस तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिण्यात आलेल्या पत्रामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास अधिक वेगाने होण्यासाठी सीबीआयच्या स्पेशल इनव्हेस्टीगेशन टीम (एसआयटी) ची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिना बोरा हत्या प्रकरणामध्ये चार तपास
टीम आणि व्यापाम घोटाळ्यासाठी चाळीस टीमची नेमणूक करणाऱ्या सीबीआयला डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासासाठी चारपेक्षा अधिक अधिकारी देता येत नाहीत, असाही आरोप करण्यात आला आहे.
दाभोलकर,पानसरे आणि कलबुर्गी यांच्या खुनांच्या घटनांमध्ये अनेक साम्य असल्याचे पुरावे समोर येत असूनदेखील तपास यंत्रणांच्यामध्ये पुरेसा समन्वय दिसून येत नाही. त्यामुळे पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन या तीनही खुनाचा तपास करणाऱ्या यंत्रणामध्ये समन्वय साधण्यात पुढाकार घ्यावा. डॉ.दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासातील दिरंगाई संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कार्यकर्ते व कुटुंबीय भेटणार आहेत.’ असेही शेवटी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आता जातपंचायती विरोधातील कायद्यासाठी लढा !
डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा तपास लागला नसला तरी कार्यकर्त्यांनी निर्धाराने आपले काम सुरू ठेवले आहे. जादूटोणाविरोधी कायदा पारित होऊन दोन वर्षे झाली. जादूटोणा कायद्याखाली आत्तापर्यंत दोनशेपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. ही चळवळ थांबली नसल्याचे निर्देशांक आहे. पुढच्या टप्यावर जातपंचायतीच्या विरोधातील कायद्यासाठी अंनिस प्रयत्नशील राहणार असल्याचेही पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.