वारकऱ्यांचा पत्र ते मोबाइल प्रवास व्हाया एसटीडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 02:21 AM2018-07-09T02:21:51+5:302018-07-09T02:22:05+5:30
पाऊले चालती पंढरीची वाट, असे म्हणत सध्या लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या प्रवासात काहीतरी वेगळे दिसले की अनेक वारकरी आपल्या खिशातून मोबाइल काढून फोटो किंवा सेल्फी काढताना दिसतात.
पुणे - पाऊले चालती पंढरीची वाट, असे म्हणत सध्या लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. या प्रवासात काहीतरी वेगळे दिसले की अनेक वारकरी आपल्या खिशातून मोबाइल काढून फोटो किंवा सेल्फी काढताना दिसतात. तसेच प्रवासाची माहितीदेखील अगदी सहजपणे मोबाइलच्या माध्यमातून घरच्यांना देत आहेत. मात्र सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी ही सर्व परिस्थिती पूर्णत: वेगळी होती.
मोबाइलच्या उपलब्धतेमुळे सध्या वारकरी व त्यांचे कुटुंबीय काही क्षणांत एकमेकांशी कनेक्ट होत आहे. मात्र, दोन ते तीन दशकांपूर्वी वारकºयांना कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी टपालसेवा हे सक्षम व माफक माध्यम होते. त्या काळी टपाल खात्याने वारीतही पत्र पोहोचविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली होती. घरी काही महत्त्वाची घटना घडली, तर वारीच्या वाटेवर तारही येत होती. मात्र, वारकºयांच्या हातात मोबाइल आल्याने वारीतील टपालचे प्रमाण कमी झाले आहे.
वारीत सहभागी झालेल्याचे नाव व मुक्काम पोस्ट आणि संत ज्ञानेश्वर महाराज की संत तुकारामांची पालखी, त्यातील दिंडी क्रमांक असा पत्ता पत्रावर टाकला की त्या-त्या वारकºयापर्यंत पत्र पोहोचत होते. राज्यातील कोणत्याही टपाल कार्यालयात वारीचे पत्र आले की, ते प्रथम पुणे किंवा पंढरपूरच्या टपाल कार्यालयांमध्ये जमा होई. त्यानंतर पालखी मुक्कामाच्या स्थळापासून जवळच्या गावातील टपाल कार्यालयात हे पत्र पाठविले जात होते. त्या-त्या गावातील पोस्टमन पालखी सोहळ्याच्या चोपदाराकडे पत्र देत. साधारण दुपारच्या जेवणानंतर पालखी मार्गस्थ होत असताना एका ठिकाणी थांबून चोपदार त्या-त्या दिंडीत पत्रांचे वाटप करत असे.
असे पाठवले जात वारीतून पत्र
वारीत पत्र येण्याबरोबरच वारीतून पत्र पाठविण्याचीही खास व्यवस्था होती. पालखी मुक्कामाच्या गावात काही शाळा हा उपक्रम राबवीत होत्या. लोणंद येथील शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडे दहा-पंधरा पोस्टकार्ड दिली जायची. घरी पत्र पाठविण्याची इच्छा असलेले वारकरी या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांकडून पत्र लिहून घेत.