संमेलनात ग्रंथदिंडी ठरणार वैशिष्ट्यपूर्ण
By admin | Published: January 7, 2016 01:09 AM2016-01-07T01:09:25+5:302016-01-07T01:09:25+5:30
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या आगामी ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडी वैशिष्ट्यपूर्ण ठरणा
पुणे : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या आगामी ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथदिंडी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून, तिचा प्रारंभ सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (१५ जानेवारी) दुपारी २ वाजता करण्यात येणार आहे.
पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ग्रंथदिंडीचा प्रारंभ होईल. अमेरिकेतील भारतीय दूतावासाचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे, सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची उपस्थिती असेल.
संत, पंत आणि तंत कवी यावर आधारित तीन स्वतंत्र चित्ररथांचा ग्रंथदिंडीत समावेश असेल. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, गोरा कुंभार, मुक्ताबाई, बहिणाबाई आणि शाहीर यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी चित्ररथांचे सारथ्य करणार आहेत. अभंग, पोवाडा, श्लोकांच्या सुरावटीत चित्ररथ मार्गस्थ होतील.
महिला संत, माहिती तंत्रज्ञान, कामगार, पर्यावरण दिंडी, विविध देशांतील पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि झिम्मा, फुगडी आणि मंगळागौरीचे विविध खेळ खेळणाऱ्या महिलांचे स्वतंत्र पथक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, राज्यघटना, सकल संत गाथा,
महात्मा जोतिबा फुले यांचे ग्रंथ, शिवाजी सावंत यांची कादंबरी,
मंगेश पाडगावकर यांचे कवितासंग्रह, लीळाचरित्र, भगवद्गीता, मोरया गोसावी यांचे चरित्र
आदी अनमोल ग्रंथ पालखीत ठेवण्यात येतील. आळंदी, देहू आणि मोरया गोसावी देवस्थानातील वारकरी दिंडीत सहभागी होणार आहेत.
निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या विद्यार्थ्यांचे ढोल, ताशा, लेझीम व झांज पथक, पुण्याच्या पाचंगे बंधूंचे सनई, चौघडा व तुतारीवादन, साताऱ्याच्या कुलकर्णींचे अब्दागिरी व वारकरी झेंडे ग्रंथदिंडीची शोभा वाढविणार आहेत. (प्रतिनिधी)