पुण्यातील समाजमंदिरांमध्ये सुरू करणार अभ्यासिका; महिला बाल कल्याण समितीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:05 PM2018-01-11T13:05:21+5:302018-01-11T13:09:40+5:30

शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेने बांधलेल्या समाजमंदिराचा काही भाग आता अभ्यासिका म्हणून वापरण्यात येणार आहे. महिला बाल कल्याण समितीच्या या प्रस्तावास समाज विकास विभागाने सहमती दर्शवली आहे.

Library to be started in Pune's Samaj Mandir; Women Child Welfare Committee's decision | पुण्यातील समाजमंदिरांमध्ये सुरू करणार अभ्यासिका; महिला बाल कल्याण समितीचा निर्णय

पुण्यातील समाजमंदिरांमध्ये सुरू करणार अभ्यासिका; महिला बाल कल्याण समितीचा निर्णय

Next
ठळक मुद्देसमाज विकास विभागाने शहरातील १३३ समाजमंदिरांची यादी दिली समितीकडेस्थायी समितीच्या मंजुरीने तो सर्वसाधारण सभेत येऊन त्यावर होईल शिक्कामोर्तब

पुणे : शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये महापालिकेने बांधलेल्या समाजमंदिराचा काही भाग आता अभ्यासिका म्हणून वापरण्यात येणार आहे. महिला बाल कल्याण समितीच्या या प्रस्तावास समाज विकास विभागाने सहमती दर्शवून काही समाजमंदिरांमध्ये येत्या काही दिवसांतच अशी अभ्यासिका सुरू करण्यात येईल, असे सांगितले आहे.
समितीच्या अध्यक्ष राणी भोसले यांनी गेल्या काही महिन्यांपासून यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कुटुंबाची निवासी जागा अतिशय कमी आकाराची असते. शाळेत जाणाऱ्या मुलांना घरात अभ्यास करता येत नाही, शाळेत तो होत नाही. याबाबत त्यांच्याकडे अनेक महिलांनी मुलांच्या अभ्यासाची काहीतरी व्यवस्था करा अशी मागणी केली होती. भोसले यांनी सांगितले की, काही झोपडपट्ट्यांची पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर असलेली ही समस्या जाणवली. समितीच्या माध्यमातून यासाठी काही करता येईल का, असा विचार केल्यानंतर समाजमंदिरांचा वापर करता येईल, असे निदर्शनास आले. 
समाजमंदिराचा तसाही सध्या फारसा चांगला वापर सुरू नाही. काही अपवाद वगळता बहुसंख्य ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका, गप्पागोष्टी यासाठीच ती वापरली जातात. समाजमंदिर बांधताना महापालिकेने ते मोठ्या जागेत बांधले आहे. शालेय मुलांसाठी तिथे अगदी कमी खर्चात व सहजपणे अभ्यासिका होऊ शकते असे स्थानिक नागरिकांनीच सांगितले. त्याप्रमाणे प्रशासनाकडे प्रस्ताव दिला होता. समाज विकास विभागाने शहरातील १३३ समाजमंदिरांची यादीच समितीकडे दिली. त्यातील अनेक ठिकाणी अशी अभ्यासिका 
सुरू करणे शक्य असल्याचेही स्पष्ट केले.
समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. प्रभारी समाजविकास अधिकारी तुषार दौंडकर व अन्य काही अधिकारी बैठकीला उपस्थित होते. समाजमंदिरांमध्ये विद्युत व्यवस्था, खुर्ची, टेबल अशी व्यवस्था करून दिल्यास शालेय मुलांना तिथे अभ्यास करता येईल, असे या वेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. क्षेत्रीय कार्यालयांकडून अधिकारी किंवा प्रभाग समिती अध्यक्ष स्तरावर अशी व्यवस्था करणे शक्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

कर्करुग्णांना १०० टक्के खर्च द्यावा
शहरी गरीब योजनेत कर्करुग्णाला त्याने उपचारावर केलेल्या खर्चापैकी फक्त ५० टक्के खर्चच देण्यात येतो. हा खर्च १०० टक्के देण्यात यावा, असा प्रस्ताव नगरसेवक अजय खेडेकर यांनी समितीकडे दिला होता. बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. आता स्थायी समितीच्या मंजुरीने तो सर्वसाधारण सभेत येऊन त्यावर शिक्कामोर्तब होईल.
समितीच्या अध्यक्ष भोसले व अन्य सदस्यांनी लगेचच अभ्यासिका सुरू करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले. येत्या काही दिवसांत किमान काही ठिकाणी, तरी त्यासाठीची सर्व व्यवस्था करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या त्या वसाहतींमधील इयत्ता ५ वी ते १०पर्यंतच्या विद्यार्थ्यांना समाजमंदिरात बसण्यासाठी काही जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. 
काही ठिकाणी अशा अभ्यासिका सुरू झाल्यानंतर, अन्य समाजमंदिर परिसरातील नागरिकांकडूनही तशी मागणी येईल, असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला.

Web Title: Library to be started in Pune's Samaj Mandir; Women Child Welfare Committee's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.