आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 02:55 PM2018-11-12T14:55:30+5:302018-11-12T14:55:43+5:30

पुण्यातील साखर संकुल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन केले.

The license for the factory of Tanaji Sawant was temporarily suspended | आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित

आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित

googlenewsNext

पुणे : पुण्यातील साखर संकुल येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन केले. शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी दिली, असे खोटे प्रतिज्ञापत्र देणाऱ्या शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या कारखान्याचा गाळप परवाना रद्द करण्यात या मागणीसाठी शेट्टी यांनी आंदोलन केले होते. त्यांच्या या पवित्र्यानंतर उस्मानाबादच्या भैरवनाथ साखर कारखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कारखान्याच्या एफआरपी दराबाबत साखर आयुक्त संभाजी कडू पाटील व स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यात बैठक पार पडली. यावेळी साखर कारखान्यांनी उसाच्या एफआरपीची थकीत रक्कम न देता ती दिल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून गाळप परवाना मिळविलेल्या कारखान्यांचे गाळप परवाने दिलेच कसे ? असा प्रश्न खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना विचारला. या संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवेदनही आयुक्तांना सादर केले. यावेळी भैरवनाथ साखर कारखान्याच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी सावंत यांना साखर आयुक्तांनी फोनवर एफआरपी दिली की नाही याची विचारणा केली. त्यावर सावंत यांनी संपूर्णपणे एफआरपी दिली असे सांगितले. त्यावेळी आयुक्तांनी चर्चेसाठी शेट्टी यांच्याशी चर्चा करण्याचे सुचवलेशेट्टी यांच्याकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, एफआरपी मिळाली नसल्याच्या त्यांचा दावा असल्याचे सांगितले. त्यावर सावंत यांनी, 'मी शिवसेनेचा नेता आहे. मी दहा कारखान्यांचा चेअरमन आहे.

एफआरपी दिली, नाही दिली तरी तुमचा काय संबंध? थकीत एफआरपी विषयी आम्ही आणि साखर आयुक्त पाहून घेऊ,' असं सांगितलं. त्यानंतर शेट्टी यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन गाळप परवाना घेणा-या सावंत यांच्या कारखान्याचा गाळप परवाना तात्काळ निलंबित करावा, अशी मागणी करत तिथेच धरणे आंदोलन सुरू केले. अखेर त्यांच्या तक्रारीची दखल घेत या कारखान्याच्या गाळप परवान्याचे तात्पुरते निलंबन करण्यात आले.

यावेळी शेट्टी म्हणाले की, सावंत यांनी एफआरपी थकली नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून परवाना मिळवला आहे. त्यांच्या भैरवनाथ शुगर्स कारखान्याचा गाळप परवाना निलंबित करून थकीत एफआरपीची चौकशी व्हायलाच हवी. एफआरपी न दिलेल्या पंधरा कारखान्यावर कारवाई करावी.तसेच ज्या प्रकारे सातारा,सांगली,कोल्हापूरचा एफआरपी तिढा सुटला तसा लवकरच सोलापूर, पुणेसह बाकी महाराष्ट्रचा तिढा सोडवला जाईल.

Web Title: The license for the factory of Tanaji Sawant was temporarily suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.