लेफ्टनंट कर्नलला वानवडी पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:07+5:302021-05-27T04:12:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लष्कर भरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात लेफ्टनंट कर्नलला वानवडी पोलिसांनी अटक केली. ...

Lieutenant Colonel arrested by Wanwadi police | लेफ्टनंट कर्नलला वानवडी पोलिसांनी केली अटक

लेफ्टनंट कर्नलला वानवडी पोलिसांनी केली अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लष्कर भरती प्रक्रियेतील लेखी पेपर फुटी प्रकरणात लेफ्टनंट कर्नलला वानवडी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याची व्याप्ती महाराष्ट्रसह इतर राज्यात पसरली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायचा असल्याने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती मान्य करीत त्याला २८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

विशेष न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी हा आदेश दिला. भगत प्रीतसिंग सरताजसिंग बेदी (वय ४४, रा. सिकंदराबाद, आंध्र प्रदेश, मूळ उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी हा रिलेशन आर्मी भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेचा प्रिंटिंग कमिटीचा प्रीसायडिंग ऑफिसर होता. त्याने आरोपींना इंग्रजी हस्तलिखित ५० प्रश्न व पर्याय असलेली प्रश्नपत्रिका पाठवली होती. ती प्रश्नपत्रिका सिकंदराबाद येथील त्याच्या घरातून जप्त करण्यात आली. मोबाइलमध्येही या प्रश्नपत्रिकेचे फोटो त्याने काढले होते. ते फोटो पत्नीच्या मोबाइलमध्ये ठेवले होते. या अनुषंगाने पत्नीचा गुन्ह्यात सहभाग आहे का, याचा तपास करायचा आहे. त्याला या प्रकरणात ३ लाख रुपये मिळाले होते. त्यापैकी दीड लाख रुपये त्याने काढून दिले असून, उर्वरित रकमेचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार आगरवाल यांनी केली. या प्रकरणात यापूर्वी थिरू मुरुगन थंगवेलू (वय ४७, रा. तमिळनाडू), किशोर महादेव गिरी (वय ४०, रा. बारामती), माधव शेषराव गिते (वय ३९, रा. सॅपिअर विहार कॉलनी), गोपाळ युवराज कोळी (वय ३९, रा. दिघी), उदय दत्तू औटी (वय २३, रा. खडकी), भारत लक्ष्मण अडकमोळ (वय ३७, रा. पाचोरा), वसंत विजय किलारी (वय ४५, मूळ. आंध्र प्रदेश) आणि वीरा प्रसाद कोटीस्वामी नारनेपाटी (वय ४१, रा. दिल्ली, मूळ आंध्र प्रदेश) या आठ जणांना या प्रकरणात यापूर्वीच अटक केली आहे. २७ व २८ फेब्रुवारी २०२१ मध्ये घडलेल्या या प्रकरणात आणखी सहा जणांवर गुन्हा दाखल आहे.

Web Title: Lieutenant Colonel arrested by Wanwadi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.