खळबळजनक! पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:31 AM2021-10-13T11:31:03+5:302021-10-13T11:38:23+5:30
पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लष्करातील एका लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
पुणे : पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लष्करातील एका लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.
रश्मी आशुतोष मिश्रा (वय ४३, रा. डेहराडुन) असे आत्महत्या केलेल्या महिला अधिकार्याचे नाव आहे. पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कुल हे महाराष्ट्रातील एक अतिशय लोकप्रिय कॉलेज आहे. या संस्थेची स्थापना १९५० मध्ये करण्यात आली आहे. येथील संस्थेत ९ वेगवेगळे अभ्यासक्रम शिकवले जातात. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.
सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी या लेफ्टनंट कर्नल महिला आली होती. ४३ वर्षाच्या या महिला लष्करी अधिकार्यानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले. कौटुंबिक कारणावरुन तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. या ठिकाणी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलिसांनी भेट दिली असून लष्कराची संबंधित हा सर्व प्रकार असल्याने त्याची वरिष्ठ पातळीवरुन तपासणी सुरु आहे़.