पुणेकराची कमाल! घराच्या टेरेसवर फुलपाखरू गार्डनचे संवर्धन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 11:52 AM2020-12-01T11:52:47+5:302020-12-01T11:57:08+5:30
गच्चीवर अनुभवता येतोय फुलपाखरांचा जीवनक्रम आणि त्यांची वर्तणूक....
पुणे : फुलपाखरू दिसायला सुंदर दिसते, पण ते रूप मिळण्यासाठी त्याला अनेक अवस्थेतून जावे लागते. फुलपाखरांच्या या जीवनक्रमाचा अंतर्भाव शालेय अभ्यासक्रमात सुद्धा केलेला आहे. फुलपाखराने अंडी घातली की त्यातून अळी बाहेर येते. अन् मग अळीचा कोष तयार होतो. या कोषातून सुंदर असे फुलपाखरू बाहेर येते. हा फुलपाखराचा जीवनक्रम मुलांना प्रत्यक्ष निरीक्षणातून अनुभवता यावा यासाठी फुलपाखरू संशोधक डॅा. अंकूर पटवर्धन यांनी गच्चीवर फुलपाखरांसाठी गार्डन तयार केले आहे.
या गार्डन मध्ये फुलपाखरांच्या जीवनक्रमाबरोबरच त्यांचा विशिष्ठ फुलांवर बसण्याचा कालावधी, फुलपाखरे किती वेळा कुठल्या फुलांवर बसतात?, त्यांना कुठले परागकण चिकटतात? ऋतुमानानुसार त्यांना आवडणारी झाडे कुठली आहेत? इत्यादि बाबींचे संशोधन चालू आहे. डॅा. पटवर्धन गेली अनेक वर्षे फुलपाखरांचा अभ्यास करत आहेत तसेच ते आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील अण्णासाहेब कुलकर्णी जैवविविधता विभागाचे प्रमुख आहेत. गेल्या दीड वर्षांपासून त्यांनी हे गार्डन जपले आहे. फुलपाखरांसाठी आवश्यक असणारी सर्व वनस्पती त्यांनी गार्डनमध्ये जतन केल्या आहेत.
मादी फुलपाखरू त्यांना आवडत्या वनस्पतीवर अंडी घालते. प्रजाती नुसार अंड्यातून आठवड्याभरात छोट्या आळ्या बाहेर येतात. आळ्या दोन-तीन आठवडे वनस्पतीची पानं खूप खातात. त्यानंतर खाणं थांबवून ते स्वत:भोवती कोष तयार करतात. एक चिकट लाळेच्या दोऱ्याने आळी स्वत:ला फांदीवर, देठावर चिटकवते व कोष अवस्थेत जाते. या काळात काही खात नाही. सात ते पंधरा दिवसांनी कोषातून फुलपाखरू बाहेर येते. आजूबाजूचे पर्यावरण, हवामान यानुसार हा कालावधी कमी जास्त होतो.
- डॅा. अंकुर पटवर्धन
हे लावा फुलपाखरं येतील...
फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी तेरडा, टणटणी, डिंगळा, भूरूंडी, झेंडू, अबोली, चित्रक, हळदीकुंकू, कोरांटी, रुई, कृष्णकमळ, कण्हेर, कढीपत्ता, लिंबू, सोनचाफा, वनस्पती घराच्या, शाळेच्या आवारात लावल्यास फुलपाखरे त्या ठिकाणी येतील.