स्वत:च्या मुलीवर बलात्कार करणा-या बापाला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 09:06 PM2019-01-28T21:06:26+5:302019-01-28T21:08:05+5:30
स्वत:च्या सात वर्षे सात महिन्याच्या मुलीवर बलात्कार तर सहा वर्षे सात महिन्याच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणा-या नराधम बापाला जन्मठेप आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
पुणे: स्वत:च्या सात वर्षे सात महिन्याच्या मुलीवर बलात्कार तर सहा वर्षे सात महिन्याच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणा-या नराधम बापाला जन्मठेप आणि चार हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायधीश एस. एच. ग्वालानी यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार असल्याचे न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
आरोपीच्या पत्नीने यासंबंधी वाकड पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 13 जानेवारी 2015 आणि त्यापूर्वीच्या सहा महिन्यांच्या कालावधीत घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी सात साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलाची साक्ष, वैद्यकिय पुरावा महत्त्वाचा ठरला. या प्रकरणाचा तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एस.धुमाळ यांनी केला. त्यांना सहायक पोलीस उपनिरीक्षक डी.एन.गवारे यांनी मदत केली.
मुलगा आणि मुलीने आईला सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावेळी सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपी हा पीडितांचा नात्याने पिता आहे. दोन्ही मुलांचे संरक्षण करणे, त्यांना शिक्षण देणे आणि देशाचे चांगले नागरिक घडविणे ही त्याची जबाबदारी आहे. तरीही त्याने पोटच्या मुलांवर लैंगिक अत्याचार केले आहेत. ही अतिशय गंभीर घटना असून, आरोपी हा समाजासाठी घातक व्यक्ती असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. यावर सुनावणी करताना न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 376(2)(ष) (बलात्कार) नुसार जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंड, तर मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी पाच वर्ष सक्तमजुरी आणि 2000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली.