Pune | सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा खून करणाऱ्याला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:59 AM2023-01-18T11:59:26+5:302023-01-18T12:05:42+5:30
या प्रकरणात न्यायालयाने खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमानुसार शिक्षा सुनावली...
पुणे : कर्जबाजारी झाल्याने सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचा खून करून स्वत: मृत झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला जन्मठेप आणि सव्वातीन लाख रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी सुनावली.
विठ्ठल तुकाराम चव्हाण (वय ४५, रा. बारामती) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. तर एकाची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी काम पाहिले.
तत्कालीन सासवड ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. आर. गौड यांनी या प्रकरणाचा तपास केला. सध्या सासवड येथे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप आहेत. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, सहायक उपनिरीक्षक विद्याधर निचित, संदीप चांदगुडे आणि शशिकांत वाघमारे यांनी काम पाहिले.
चव्हाण कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याने आणि साथीदाराने चव्हाणसारखा दिसणारा विनायक उर्फ पिंटू ताराचंद तळेकर (वय ३२, रा. कोंडीत खुर्द, ता. पुरंदर) याला दारू पाजली. एका चारचाकी गाडीतून कात्रज घाट, कोंढणपूर मार्गे वेळू येथील मरिआई घाट येथे नेले. तळेकर याला चालक सीटवर बसवून त्याच्या अंगावर आणि गाडीवर पेट्रोल ओतण्यात आले. पेटवून दिले होते. या प्रकरणात न्यायालयाने खून आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमानुसार शिक्षा सुनावली.