Pune Crime: आईचाच जीव घेणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा, इंदापूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 05:41 PM2024-05-04T17:41:10+5:302024-05-04T17:41:53+5:30
घटनेदिवशी फिर्यादी प्रदीप मिसाळ हा सकाळी इंदापूर येथे महाविद्यालयाला गेला, तर कलावती व संदीप हे दोघेच घरी होते...
बारामती : आईच्या हत्येप्रकरणी मुलास बारामती येथील अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे. पी. दरेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संदीप वेताळ मिसाळ (वय ३५, रा. भोगवस्ती, काटी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे या आरोपी मुलाचे नाव आहे.
२४ जुलै २०१४ रोजी भोंग वस्ती, काटी (ता. इंदापूर) येथे कलावती मिसाळ यांच्या घरी ही घटना घडली. आरोपी काहीही कामधंदा करत नव्हता. त्यावरून आरोपी संदीप, मयत कलावती व फिर्यादी प्रदीप मिसाळ यांच्यामध्ये वादविवाद होत असत. घटनेदिवशी फिर्यादी प्रदीप मिसाळ हा सकाळी इंदापूर येथे महाविद्यालयाला गेला, तर कलावती व संदीप हे दोघेच घरी होते. प्रदीप दुपारी घरी आला, तेव्हा आरोपी संदीप हा त्यांच्या घराच्या बाहेर खुर्चीवर बसला होता. त्याच्या कपड्यास रक्ताचे डाग होते. आरोपीने फिर्यादीस आईस काय झाले आहे, आईला कुणीतरी मारले आहे असे कथन केले. त्यानंतर फिर्यादीने नातेवाईक व शेजाऱ्यांकडून याबाबत चर्चा केली. त्यावर घरी कोणीही आले नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्या अनुषंगाने इंदापूर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२ व २०१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पी. व्ही. काळे यांनी केला. आरोपीने त्याची आई कलावती हिचा कुदळ व कुऱ्हाडीने डोक्यात, तोंडावर, कपाळावर वार करून हत्या केल्याचे व घरात सांडलेले रक्त व कुऱ्हाडीचे व कुदळीचे रक्त पुसून पुरावा नष्ट केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले होते.
या प्रकरणाची अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. पी. दरेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. या प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे अति. जिल्हा सरकारी वकील प्रसन्न जोशी यांनी कामकाज पाहून ८ साक्षीदार तपासले. तसेच या खटल्यामध्ये डॉ. नामदेव गार्डे यांचा न्याय वैद्यकीय पुरावा, तसेच इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. हा खटला परिस्थितीजन्य पुरावा व वैद्यकीय पुरावा यांवर आधारित होता. आलेला पुरावा व सरकारी वकील जोशी प्रसन्न यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच भा. दं. वि. कलम २०१ मध्ये पुरावा नष्ट केला म्हणून ३ वर्षे सक्तमजुरी व दंड न भरल्यास १ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.