विसर्जन मिरवणुकीतल्या भांडणातील खुनासाठी जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:15 AM2021-09-08T04:15:52+5:302021-09-08T04:15:52+5:30

पुणे : विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचताना झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून डोक्यात फरशी मारत खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप ...

Life imprisonment for murder in an altercation | विसर्जन मिरवणुकीतल्या भांडणातील खुनासाठी जन्मठेप

विसर्जन मिरवणुकीतल्या भांडणातील खुनासाठी जन्मठेप

Next

पुणे : विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचताना झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून डोक्यात फरशी मारत खून केल्याप्रकरणी एकाला जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागेल, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला.

दीपक सुदाम गायकवाड (वय २७) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. रोहन घोडके (वय ३६) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत रोहन यांचे भाऊ रोहित यांनी फिर्याद दिली आहे. २८ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास सदाशिव पेठ परिसरात ही घटना घडली.

टिळक रोड परिसरात एका गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत दीपक नाचत होता. तो मिरवणुकीत महिलांना धक्का मारत असल्याने मंडळाचे कार्यकर्ते श्रीपाद शेळके यांच्या मुलीस त्याचा धक्का लागला. या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यावेळी शेळके यांच्यासह मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी दीपक याला समजून सांगितल्याने त्याने माफी मागितली. त्यानंतर फिर्यादी हे मिरवणूक सोडून पत्नीला घेण्यासाठी घरी गेले होते. त्यावेळी फिर्यादी हे त्यांचा भाऊ रोहन यांच्यासह इतर कार्यकर्त्यांबरोबर गप्पा मारत उभे होते.

त्यावेळी दीपक हा ठिकाणी आला आणि शेळके कुठे आहे, त्याच्या मुलीला धक्का मारलेला नसताना ही त्याने मला मारहाण केली, असे म्हणाला. त्यावेळी रोहन हा शेळके कोठे आहे हे मला माहिती नाही, असे म्हणाल्याने त्याचा राग मनात धरून ‘तुझा कसा काटा काढतो’ असे म्हणत दीपक याने खाली पडलेली फरशी उचलून ती रोहन याच्या डोक्यात व हातावर मारून त्यांचा खून केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी काम पाहिले. खटल्यात त्यांनी आठ साक्षीदार तपासले. गुन्हा गंभीर असल्याने आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ॲॅड. घोगरे-पाटील यांनी युक्तिवादादरम्यान केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक इप्पर यांनी गुन्ह्याचा तपास केला. न्यायालयीन कामकाजात खडक पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दिलीप मांडेकर यांनी मदत केली.

Web Title: Life imprisonment for murder in an altercation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.