तिहेरी हत्याकांडप्रकरणी एकास मरेपर्यंत जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 09:36 PM2018-07-31T21:36:30+5:302018-07-31T21:39:17+5:30
आपल्यामागे तिघींना त्रास होऊ नये म्हणून आधी त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन स्कार्पने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तो अपयशी ठरला.
पुणे : कर्जबाजारी झाल्याने आई व पत्नीसह सात वर्षीय मुलीचा झोपेत असताना स्कार्पने गळा आवळून खून केल्याप्रकरणी एकास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी मंगळवारी ही शिक्षा सुनावली. खून करण्यापुर्वी त्याने तिघींनाही झोपेच्या गोळ्या दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच त्यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
सागर माधव गायकवाड (वय ४०, रा. फातिमानगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याची आई शंकुतला (वय ५८), पत्नी कविता (वय ३४) आणि मुलगी इशिताचा दि. ९ एप्रिल २०१४ रोजी खून केला होता. या खटल्यामध्ये सागरच्या मित्राची साक्ष महत्त्वाची ठरली. सहायक सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी या मित्रासह एकुण १६ साक्षीदार तपासले. सागरने घरातील संगणकावर दि. ४, ५ व ६ एप्रिलला आत्महत्या करण्याच्या पध्दतीची माहिती घेतली होती. पोलिसांनी मिळविलेली हार्डडिस्कमधील माहिती व सीसीटीव्ही फुटेजही या खटल्यात महत्वपुर्ण ठरले.
सागर आणि कविता यांचा २००३ मध्ये प्रेमविवाह झाला होता. कविता या एका नामांकित शाळेत शिक्षिका होत्या. तर, मुलगी दुसरीत शिकत होती. घटनेच्या काही दिवस आधीच त्याची नोकरी गेली होती. बँक तसेच सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडणे त्याला शक्य होत नाही. त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आपल्यामागे तिघींना त्रास होऊ नये म्हणून आधी त्यांना झोपेच्या गोळ्या देऊन स्कार्पने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्यात तो अपयशी ठरला. दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन पोलिस ठाण्यात जात गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयात मात्र त्याने साक्ष फिरविली होती. कावेडिया यांनी सर्व साक्षीदार व पुराव्यांच्या आधारे त्यानेच खुन केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत फाशीच्या शिक्षेची मागणी केली. न्यायालयाने खुनप्रकरणी त्याला दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेप आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा तर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा महिने सक्तमजुरी आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने विधी आयोगाचा फाशीबाबतचा अहवालाचा दाखला देत तसेच ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना नसल्याचे निकालात नमुद करीत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
.................
निवृत्तीदिवशी जन्मठेपेचा निकाल
डीएसके फसवणुक प्रकरण, बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलिस कोठडी, जामीन याची सुनावणी विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयासमोर झाली आहे. त्यामुळे हे न्यायालय मागील काही महिन्यांपासून चर्चेत होते. मंगळवाणी सरदेसाई यांनी तिहेरी हत्याकांड प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याच दिवशी ते निवृत्त झाल्याने हा त्यांचा अखेरचा खटला ठरला.