पतीच्या खूनप्रकरणी पत्नीसह प्रियकराला जन्मठेप
By admin | Published: August 4, 2015 03:26 AM2015-08-04T03:26:45+5:302015-08-04T03:26:45+5:30
अनैतिक संबंधांमध्ये विरोध करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश तिवारी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पुणे : अनैतिक संबंधांमध्ये विरोध करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश तिवारी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
पूनम भगवतीप्रसाद गांधी (वय २७, रा. आंबेगाव बुद्रुक) व निखिल दीपक कांबळे (वय २४, वेताळनगर, आंबेगाव बुद्रुक) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. भगवतीप्रसाद रामदयाल गांधी (वय ३८, रा. आंबेगाव बुद्रुक) यांचा खून करण्यात आला होता.
पतीचा काटा काढण्यासाठी पूनमने ३० मे २०१३ रोजी घरामध्ये तयार केलेल्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या घातल्या. जेवण करून प्रसाद झोपल्यानंतर निखिल याला घरी बोलावून घेतले. गांधी यांचा गळा आवळून खून केल्यानंतर धोपटण्याने गुप्तांगावर घाव घातले होते. त्यानंतर तिने निखिलला घरी पाठवून पोलीस ठाण्यात जाऊन प्रसाद घरामध्ये बेशुद्धावस्थेत पडल्याचे सांगितले. शवविच्छेदनामध्ये त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते.
पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी खटल्यात साक्षीदार तपासताना दोघांनी केलेल्या निर्घृण खुनाबद्दल जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने जन्मठेपेसह दहा हजार रुपयांचा दंंड, तसेच झोपेच्या गोळ्या देऊन मारहाण केल्याप्रकरणी ७ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा अतिरिक्त दंड सुनावला.
तसेच पूनमला पुरावा नष्ट करण्यासाठी ७ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)