आयुष्य म्हणजे एका कुंडीतलं झाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:11 AM2021-09-24T04:11:08+5:302021-09-24T04:11:08+5:30
आज खूप दिवसांनी म्हटले तर वर्षानी गच्चीतील झाडे नीटनेटकी करावीत असा विचार आला. कुंडीमध्ये जास्वंद, तुलसी, कोरफड, गुलाब आदी ...
आज खूप दिवसांनी म्हटले तर वर्षानी गच्चीतील झाडे नीटनेटकी करावीत असा विचार आला. कुंडीमध्ये जास्वंद, तुलसी, कोरफड, गुलाब आदी झाडे आहेत.
त्या रोपांना नीटनेटके करताना आणि कुंडी खुरपताना जाणवलं की, जंगली रोपे खूप वाढली होती त्यामुळे जास्वंदी किंवा गुलाबाच्या रोपाला वाढण्याकरिता काही वावच नव्हता. त्या जंगली रोपांची मुळे अतिशय घट्ट होती. काही केल्या जमीन लवकर सोडतच नव्हती. इतके दिवस जे काही खतपाणी घातले त्या जास्वंदीबरोबर या जंगली रोपांनीही शोशून घेतले. तुम्ही म्हणाल हे काय सांगतीय हे तर सगळ्यांना माहीत आहे, पण माझ्या मनात आलं ही गोष्ट आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडित आहे. एक कुंडी म्हणजे आपण आणि रोप म्हणजे आपली ध्येय. आजूबाजूला येणारी जंगली झाडे म्हणजे आपले निगेटिव्ह विचार, परिस्थिती
आपल्या आयुष्यात येणारी माणसे, आपल्याला ध्येय साध्य करण्यापासून दूर लोटणारे विचार इ. गोष्टी. झाडाला जसे आपण खतपाणी घालतो तसेच आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपण मेहनत घेतो, परिश्रम करतो. पण आपली मेहनत व परिश्रम ध्येय साध्य करण्यात पूर्णपणे न जाता इतर गोष्टींमध्ये पण जाते. झाडाला जसे खतपाणी पूर्णपणे मिळत नाही तसेच मेहनत व परिश्रम आपले ध्येय पूर्णपणे साध्य करण्यासाठी लागत नाही. जेव्हा जंगली झाडे काढत होते तेव्हा असे जाणवले की, त्याची मुळे घट्ट मातीत रोवली गेली आहेत; ती सहज निघत नव्हती कारण ती जंगली झाडे काढायला उशीर झाला होता. झाड पूर्णपणे वाढण्याकरिता अधूनमधून खुरपणी करून जंगली झाडे काढायची असतात. तसेच आपल्या आयुष्यात आपले ध्येय साध्य करण्याकरिता आपण निगेटिव्ह विचार, ध्येयापासून दूर लोटणारे विचार, ध्येयापासून परावृत्त करणारी माणसे काढून टाकायची असतात. तसेच आयुष्यात आपली निगेटिव्हिटी काढण्यास उशीर झाला तर ती आपल्यामध्ये घर करून बसते व आपल्याला ध्येयापासून लांब नेते.
--