सासूने वाचविले सुनेचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 09:17 PM2018-06-28T21:17:47+5:302018-06-28T21:24:08+5:30
आपल्या तीस वर्षीय सूनेला किडनी दान करून तिला जीवदान देत इतर सासूंसमोर त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
पुणे : सासू म्हणजे सासूच! ती कधीही आई होऊ शकत नाही. सुनेला ती नेहमीच पाण्यात पाहाणार अशी नववधूला भीती घातली जाते. त्यामुळेच कुटुंबात लग्न होऊन गेल्यानंतर सासूशी कसे वागायचे? असा गहन प्रश्न नववधूला पडतो. पण सगळ्याच सासू एकसारख्या नसतात. त्या आपल्या सूनेवरही मुलीइतकेच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त प्रेम करतात. हे एका मुस्लिम कुटुंबातील सासूने सिद्ध करून दाखविले आहे. आपल्या तीस वर्षीय सूनेला किडनी दान करून तिला जीवदान देत इतर सासूंसमोर त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
बातुल हाजी सय्यद असे त्या पन्नास वर्षीय सासूचे नाव आहे. नझेमा अवजैन सय्यद या आपल्या सूनेसाठी त्यांनी हे पाऊल उचलले. संगमनेर शहरात राहाणा-या नझेमा यांना एक मुलगा आहे. २०१६ पासून त्या किडनी तज्ञ डॉ. श्रीनिवास अंबिका यांच्याकडे उपचार घेत होत्या. त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते त्यामुळे त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत असे. जो नियंत्रणात ठेवणे अवघड होते. त्यांचे वय कमी असल्याने योग्य दाता उपलब्ध झाल्यास पुनर्रोपण हाच सर्वोत्तम पर्याय होता. नझमा यांचे पालक किडनी देण्यास उत्सुक होते तरी त्यांच्या आरोग्याची स्थिती पाहाता ते शक्य नव्हते. शेवटी सासू मदतीसाठी पुढे आल्या आणि आपली एक किडनी स्वखुशीने द्यायला तयार झाल्या. एका खासगी रूग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.
नझमा म्हणाल्या, सुरूवातीस गर्भावस्थेमध्ये मला थायरॉईडचा त्रास आहे आणि उच्च रक्तदाब आहे असे निदान केले. आठवड्यातून दोनवेळा मला डायलिसिससाठी पुण्यात हलविण्यात आले होते. माझ्या मुलाला सासूबाई पाहायच्या पण जीवनात काही चांगले घडण्यासाठी हा निर्णय घेतला. डॉ. अवंतिका भट , डॉ. नितीन गाडगीळ, डॉ. केतन पै, डॉ. किरपेकर व डॉ. योगेश सोहोनी या डॉक्टरांच्या टिमने व व्हस्क्युलर तज्ञ डॉ. धनेश कार्मेकर यांनी शस्त्रकिया यशस्वीपणे पार पाडली.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------