‘चार’ गुणांसाठी आयुष्य संपविले...
By admin | Published: June 1, 2017 03:56 AM2017-06-01T03:56:54+5:302017-06-01T03:56:54+5:30
‘आई, बाबा सॉरी’ असे म्हणत, अवघ्या ‘चार’ गुणांमुळे बारावीत नापास झालेल्या विद्यार्थिनीने आयुष्यच संपविल्याची दु:खद घटना मंगळवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘आई, बाबा सॉरी’ असे म्हणत, अवघ्या ‘चार’ गुणांमुळे बारावीत नापास झालेल्या विद्यार्थिनीने आयुष्यच संपविल्याची दु:खद घटना मंगळवारी सायन परिसरात घडली. दीप्ती दीपक मोरे, असे तिचे नाव होते. तिला दहावीत ८६ टक्के मिळाले होते. बारावीत चार गुण कमी पडले म्हणून ती नापास झाली. याच नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. याप्रकरणी वडाळा टी.टी. पोलीस अधिक तपास करत आहेत.
सायन येथील पंचशीलनगर झोपडपट्टीत दीप्ती आई, बाबा, भाऊ आणि बहिणीसोबत राहायची. बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही दीप्तीने अभ्यासावर अथक मेहनत घेऊन, दहावीच्या परीक्षेत ८६ टक्के गुण मिळविले. त्यानंतर तिने सिद्धार्थ कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. मात्र, अवघ्या चार गुणांमुळे ती नापास झाल्याचे तिला समजले. हे ऐकूण कुटुंबीयांसह तिलाही धक्का बसला. खरंतर तिला जास्त गुणांची अपेक्षा होती.
नापास झाल्यामुळे तिने दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. बराच वेळ दीप्तीच्या खोलीतून आवाज येत नसल्याने कुटुंबीय तेथे गेले. त्या वेळी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला सायन रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वडाळा टी.टी. पोलीस तेथे दाखल झाले.
घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाइड नोटही ताब्यात घेतली आहे. त्यात, ‘नापास झाल्यामुळे आत्महत्या करत असून, यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये,’ असे तिने म्हटले आहे. शिवाय, ‘आई, बाबा सॉरी’ असेही नमूद केले आहे. हुशार, तसेच सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या दीप्तीने आत्महत्या केल्यामुळे मोरे कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांनाही मोठा धक्का बसला आहे.