शिवरायांचे चातुर्य हे रयतेच्या कल्याणासाठीच होते; गोविंददेव गिरी महाराज यांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2024 12:12 AM2024-06-07T00:12:29+5:302024-06-07T00:12:49+5:30
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डाॅ. विजय दर्डा यांच्या हस्ते देण्यात आला.
पुणे : आद्य पत्रकार देवर्षी नारद मुनी यांचा अंश असलेल्या पत्रकारांकडून मिळालेला जीवनगौरव पुरस्कार म्हणजे जनमानसाने पाठीवर दिलेली थाप आहे, अशी कृतज्ञता अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केली. शिवराज्यभिषेक दिनानिमित्त मिळालेल्या पुरस्काराचे औचित्त्य त्यामुळेच मोठे असून शिवरायांचे चातुर्य हे रयतेच्या कल्याणासाठीच होते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डाॅ. विजय दर्डा यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यपाल भगतसिंह कोशारी, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पुढारी वृत्तपत्र समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, कोहिनूर समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मालपाणी समूहाचे संजय मालपाणी, अभिनेते भाऊ कदम, संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी उपस्थित होते.
ते म्हणाले, “माझ्यातील गुणांचा विकास करण्यासाठी असे पुरस्कार कामी येतात. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार मिळाला असून हे माझे भाग्य आहे. शिवराज्याभिषेक हा देशाच्या आजवरच्या परंपरेतील सुवर्णक्षण असून शिवरायांनी निजामापासून इंग्रजांचा विरोध मोडीत काढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्याचा अर्थ म्हणजेच हिंदू साम्राज्य असाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती नव्हते; ते एक उच्च विभूती, असाधारण कर्तृत्वाचे महापुरुष होते. हिंदू साम्राज्याच्या निर्मितीसाठी शौर्य, चातुर्य, प्रताप, सूक्ष्म व्यवस्थापन याचा अंगीकार करत त्यांनी आदर्श राजाचा वस्तुपाठ घालून दिला. रामराज्याची संकल्पना असलेल्या रामायण आणि व्यवस्थापन कौशल्याचा महाग्रंथ असलेल्या महाभारतातील सद्गुणांची बेरीज म्हणजे छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व व चरित्र आहे.”
श्रीराम आणि छत्रपतींचा विचार सर्वसमावेशकतेचा
डॉ. विजय दर्डा म्हणाले की, प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. ते एका समाजाचे नव्हते. सर्व जाती आणि धर्मांचे होते. तो आदर्श घेऊन आपल्याला सर्वसमावेशकतेकडे वाटचाल करायची आहे. महाराजांनी शिवपुराण शिवचरित्र तसेच गीतेमधून समाजाला जागृत करण्याचे काम केले आहे. तरुणांपर्यंत हे विचार गेले पाहिजेत. नवीन पिढी सुसंस्कृत होण्यासाठी शिवरायांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. पत्रकार म्हणून लेखणी चालवण्याची जबाबदारी ज्यांची आहे, त्यांनी देखील हे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. गीतेमध्ये कर्म करत असताना फळाची अपेक्षा करू नये, असे सांगितले आहे. मात्र चांगल्या फळाची अपेक्षा करत राहावी.’’ गोविंददेव गिरी महाराजांचे काम मोठे असून त्यांच्या सन्मानास उशीर झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आपण राम मंदिराची होण्याची वाट पाहत राहिलो. मात्र त्यांनी भारतरत्न पुरस्काराइतके मोठे काम केले असून हे काम अतिशय मोलाचे आहे. जीवनगौरव पुरस्कार देऊन आपण सर्वच सन्मानित झालो असल्याचेही दर्डा यावेळी म्हणाले. दरम्यान, ‘लोकमत’ने पुण्यात पदार्पण करून पंचवीस वर्षे झाली आहेत. पुणेकर चोखंदळ आहेत. पुणेकर एखाद्याला विचारपूर्वकच जवळ करतात आणि एकदा जवळ केले की मग मात्र फेव्हिकॉलही कमी पडतो, अशा शब्दांत त्यांनी पुणेकरांचे आभार मानले.
संत विश्वव्यापी विचारांचे प्रतीक
कोश्यारी म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचे विचार माझा आदर्श आहे. येथील संत, महापुरुष हे विश्वव्यापी विचारांचे प्रतीक आहेत.” पाटील म्हणाले, “समाजातील रत्ने शोधून त्यांना सन्मानित करण्याचे पत्रकार संघाचे कार्य कौतूकास्पद आहे.”
संपादक संजय आवटे यांचा सन्मान
डॉ. योगेश जाधव, कृष्णकुमार गोयल यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, स्वप्नील सावरकर, अविनाश चिलेकर, ज्ञानेश्वर बिजले, उद्योजक संजय मालपाणी, अभिनेता भाऊ कदम, बांधकाम व्यावसायिक विश्वास जावडेकर, गिरीराज सावंत, ओंकार वासकर, ईश्वर गौरांगदास, राजेंद्र शिळीमकर, बाबा कांबळे, नीलेश खेडेकर, दशरथ भोसले, सिद्धार्थ भोकरे या कर्तव्यदक्ष उच्चपदस्थ अधिकारी, संपादक-पत्रकार व मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. किरण जोशी यांनी स्वागतपर भाषण केले. संजय भोकरे यांनी प्रास्ताविक केले. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.