महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव नरेंद्र चपळगावकर अन् प्रेमा पुरव यांना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 05:56 PM2022-01-10T17:56:17+5:302022-01-10T17:56:32+5:30
'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे देण्यात येणारा मानाचा दिलीप वि. चित्रे स्मृति साहित्य जीवनगौरव पुरस्कार निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना वैचारिक लेखनासाठी तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार अन्नपूर्णा परिवाराच्या प्रेमाताई पुरव यांना जाहीर झाला
पुणे : 'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे देण्यात येणारा मानाचा दिलीप वि. चित्रे स्मृति साहित्य जीवनगौरव पुरस्कार निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना वैचारिक लेखनासाठी तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार अन्नपूर्णा परिवाराच्या प्रेमाताई पुरव यांना सोमवारी जाहीर झाला. दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
साधना ट्रस्ट आणि मासूम संस्थेच्या वतीने महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारांची घोषणा विनोद शिरसाठ, रमेश अवस्थी आणि सुनीती सु. र. यांनी पत्रकार परिषदेत केली. बाबा राम रहीम याच्या विरोधात प्रखर लढा दिलेले सामाजिक कार्यकर्ते अंशुल छत्रपती (हरियाणा) यांना ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ आणि अक्षरनामा वेबपोर्टलचे संपादक राम जगताप यांना ‘डिजिटल पत्रकारिता विशेष पुरस्कार’ देण्यात येणार आहे. पर्यावरण विषयक
वाङ्मय पुरस्काराने संतोष शिंत्रे यांना गौरविण्यात येणार आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.
रमेश अंधारे यांच्या दगडी मक्ता या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार, मुक्ता बाम यांना रा. शं. दातार नाट्य पुरस्कार, डॉ. सिसिलिया कार्व्होलो यांच्या टिपंवणी या साहित्यकृतीला अ-पारंपारिक-वैचारिक ग्रंथ पुरस्कार, सुरेश सावंत यांना कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार, सुनीता भोसले यांना कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार देण्यात येणार आहे. पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. पंचवीस हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह या स्वरूपाचा युवा पुरस्कार युवराज गटकळ यांना देण्यात येणार आहे.
गतवर्षी पुरस्कार जाहीर झाले; पण वितरण होऊ शकले नाही. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊन परिस्थिती सामान्य राहिली तर मार्च महिन्यात पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस असल्याचे शिरसाठ यांनी स्पष्ट केले.