२१ तोळे सोन्याचे दागिने लंपास
By admin | Published: July 15, 2016 12:29 AM2016-07-15T00:29:24+5:302016-07-15T00:29:24+5:30
घरात कोणीही नसल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ‘बालाजी हाइट्स’ या गृहनिर्माण संस्थेतील फ्लॅटमधून ३ लाख ९९ हजार रुपये किमतीचे
लोणी काळभोर : घरात कोणीही नसल्याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ‘बालाजी हाइट्स’ या गृहनिर्माण संस्थेतील फ्लॅटमधून ३ लाख ९९ हजार रुपये किमतीचे २१ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना १३ जुलै रोजी भर दुपारी घडली.
लोणी काळभोर पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरीसंदर्भात शशिकांत चंद्रकांत साबळे (वय ५५ वर्षे, रा. बालाजी हाइट्स, फ्लॅट क्र. ७, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. साबळे हे वाघोली येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे व्यवस्थापक म्हणून काम करतात. त्यांच्या सासूबाई पालखीसोबत पंढरपूरला गेल्या आहेत. त्यामुळे सासूबार्इंनी स्व:ताचे सोन्याचे दागिने साबळे यांच्या घरी आणून ठेवले होते.
१३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता साबळे व त्यांची मुलगी कल्याणी हे कामाला निघून गेले होते. मुलगा अभिषेक हा ११ वाजता क्लासला व पत्नी संगीता या १२.३० वाजण्याच्या सुमारास हडपसरला दवाखान्यात गेल्या. संगीता यांनी जाताना फ्लॅटला कुलूप लावून कुलपाची चावी शेजारील एका घरात ठेवली होती. मुलगा अभिषेक दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घरी आला असता, त्याला फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्याने शेजारच्या फ्लॅटमध्ये विचारले असता त्यांनी कुणालाच चावी दिलेली नव्हती. त्याने सदर बाब तत्काळ बहिणीला, तर तिने वडिलांना कळविले.
या घटनेत अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे कुलूप बनावट चावीने उघडून व लोखंडी कपाटाचे कुलूप उचकटून त्यांत ठेवलेले १ लाख ९० हजार रुपये किमतीचे १० तोळे वजनाचे गंठण, २८ हजार ५०० रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे कानांतील टॉप्स, ९ हजार ५०० रुपये किमतीचे अर्धा तोळा वजनाचे कानांतील टॉप्स, १ लाख ७१ हजार रुपये किमतीचे ९ तोळे वजनाचे नेकलेस असे एकूण ३ लाख ९९ हजार रुपये किमतीचे २१ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. यांव्यतिरिक्त या घटनेत साबळे यांची सासू अरुणा कदम यांनी वारीला जाताना ठेवलेले दागिनेही चोरट्यांनी लंपास केले असून, त्यांनी किती दागिने ठेवले होते याबद्दल साबळे यांना माहिती नसल्याने त्याची माहिती सासू वारीवरून परत आल्यानंतर ते देणार आहेत.
पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. या संदर्भात पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. बडवे पुढील तपास करीत आहेत.(वार्ताहर )